क्रांतीच्‍या घोषणा देत फासावर चढून ‘तेजस्‍वी राष्‍ट्र’ बनवणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु !

आज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

‘फाशीच्‍या दिवशी सायंकाळी भगतसिंग मनाने शांत-चित्त होते. आपल्‍या बेड्यांच्‍या तालावर मृत्‍यूसन्‍निधही ते कोठडीत त्‍यांचे आवडते गाणे गात होते. ‘मेरा रंग दे बसन्‍ती चोला । इसी रंग में रंग के शिवाने माँ का बंधन खोला । मेरा रंग दे ॥ यही रँग हल्‍दीघाटी में खुल कर के था खेला । नव बसन्‍त में भारत के हित वीरों का यह मेला । मेरा रंग दे ।’ (अर्थ : माझी सर्व काया वसंती रंगात अंतर्बाह्य रंगू दे. याच रंगात रंगून शिवाजीने मातेला दास्‍यातून मुक्‍त केले आणि (राणा प्रतापच्‍या वेळी) हळदी घाटात नववसंतऋतूत याच रंगात रंगून वीर पुरुषांचा हा मेळा भारताच्‍या हितासाठी खेळला होता.)

भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव

१. कक्षपाल सुखदेवांना फाशीसाठी नेण्‍यासाठी येताच त्‍यांच्‍यासह संपूर्ण कारागृह परिसर घोषणांनी दुमदुमणे

संध्‍याकाळी ७ वाजण्‍याच्‍या काही वेळ आधी तुरुंगात चतुरसिंह नावाचा सैन्‍यातून निवृत्त झालेला एक वृद्ध हवालदार कक्षपाल होता, तो भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्‍या आवाराचे कुलूप उघडून तिघांनाही हातकड्या घालून फाशीच्‍या स्‍तंभाकडे नेण्‍यासाठी आत आला. तो प्रथम सुखदेवांच्‍या कोठडीत शिरला नि त्‍यांना हातकड्या घालू लागला. तेव्‍हा सुखदेवांनी त्‍यांच्‍या नेहमीच्‍या शूर, लढाऊ स्‍वभावाप्रमाणे त्‍याच्‍याशी झगडा चालू केला. त्‍यांची ती धडपड ऐकताच शेजारच्‍या कोठडीतून राजगुरूंनी तेथे काय घडते आहे, ते ओळखले नि ते लागलीच मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले, ‘इन्‍किलाब झिंदाबाद’, ‘लाँग लिव्‍ह रिव्‍हॉल्‍यूशन’ (क्रांती चिरंजीव), ‘डाऊन वुइथ इंपिरिअ‍ॅलिझम’ (साम्राज्‍यशाही खाली करा), ‘वन्‍दे मातरम् !’ या घोषणा देण्‍याचा हेतू हा की, तुरुंगातील सर्व बंदीवानांना त्‍या तिघांना फाशी दिली जात होती, ते कळावे. या घोषणा ऐकताच सुखदेवही त्‍या देऊ लागले नि मग सर्व कारागृहात एका बराकीतून दुसर्‍या बराकीत घोषणा होऊ लागल्‍या !

या कल्लोळातच चतुरसिंग सुखदेवांची झटापट दाखवत भगतसिंग यांना म्‍हणाला, ‘माझ्‍यावर दया करा ! हातकड्या घालण्‍याचा मला हुकूम आहे !’ सुखदेव मृत्‍यूला घाबरून हा विरोध करत नव्‍हते, तर एक ‘दमदार झुंज’ म्‍हणून झुंजत होते. भगतसिंगांनी मग त्‍यांना समजावले नि सुखदेव यांनी हातकड्या घालू दिल्‍या. राजगुरु-भगतसिंगांनाही मग हातकड्या घालण्‍यात आल्‍या. आता सर्व तुरुंगभर बंदिवानांना आज आपणा सर्वांना लवकर कोठडीत बंद का करण्‍यात आले ? ते कळले.

२. तीनही क्रांतीकारकांनी बेडरपणे फाशीघरापर्यंत जाणे

कोठडीच्‍या आवाराबाहेर पडताच भगतसिंग गाऊ लागले, ‘दिलसे निकलेगी न मर कर भी वतन की उलफत, मेरी मिट्टीसे भी खूशबू-ए-वतन आयेगी।’ (अर्थ : मेल्‍यानंतरही देशावरचे प्रेम माझ्‍या हृदयातून नाहीसे होणार नाही ! माझ्‍या मातीतूनसुद्धा देशाच्‍या मातीचाच सुगंध येत राहील !’) भगतसिंगांच्‍या उजव्‍या हाताला राजगुरु होते आणि डाव्‍या बाजूला सुखदेव. तेही भगतसिंगांच्‍या सुरात सूर मिळवून तेच गाणे मोठ्याने गाऊ लागले. त्‍यांच्‍या पुढे नि मागे तुरुंगाचे कक्षापाल, बंदिपाल, अधीक्षक अन् इतर अधिकारी होते. या लोकांनी फाशी घराकडे जाणारा देशभक्‍तांचा असा बेडर मोर्चा आयुष्‍यात पाहिला नसेल ! तिघेही क्रांतीकारक तसेच बेडरपणे फाशीघरापर्यंत चालत गेले. मृत्‍यूचे त्‍यांना लवलेशही भय नव्‍हते. एका महान् राष्‍ट्राचे ते महान सुपुत्र होते. त्‍याच धैर्यशीलपणाने ते फाशीघराजवळ पोचले आणि मग फाशीघराचा काळा दरवाजा उघडला नि ते त्‍यात शिरले.

३. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी दिली गेली तो क्षण

तेथे फाशीच्‍या तख्‍ताजवळ त्‍यांना इंग्रज अधिकारी दिसले. त्‍यांच्‍यापैकी एकाला भगतसिंग इंग्रजीत म्‍हणाले, ‘‘Well Mr. Magistrate, you are fortunate to be able to see today how Indian revolutionaries can embrace death with pleasure for the sake of their supreme ideal!’ !’ (अर्थ : बरे आहे मॅजिस्‍ट्रेटसाहेब, हिंदी क्रांतीकारक आपल्‍या सर्वोच्‍च ध्‍येयासाठी मृत्‍यूला आनंदाने कसे कवटाळू शकतात, ते आज तुम्‍हाला पहाता येत आहे, इतके तुम्‍ही भाग्‍यवान आहात !’) त्‍यांचे हे तेजस्‍वी उद़्‍गार ऐकून दंडाधिकारी स्‍तब्‍धच झाले. भगतसिंगांनी मग अधिकार्‍यांना विनंती केली, ‘फाशीपूर्वी आपणास २ मिनिटे स्‍वतःच्‍या घोषणा करू द्याव्‍यात’. त्‍यांना ते म्‍हणाले, ‘आपण आमची ही शेवटची विनंती मान्‍य कराल, अशी मला आशा आहे.’ तुरुंगाच्‍या अधीक्षकाने मौन राखून त्‍यांची ती विनंती मान्‍य केली. तिघाही क्रांतीकारकांनी मग त्‍यांच्‍या नेहमीच्‍या घोषणा जोरजोराने दिल्‍या. त्‍यानंतर ते फाशीच्‍या तख्‍तावर चढले. त्‍यांचे पाय बांधण्‍यात आले. त्‍यांनी फासाचे चुंबन घेतले. फाशीची काळी टोपी त्‍यांच्‍या मुखावर ओढण्‍यात आली नि फास गळ्‍यात टाकण्‍यात आला. तो नीट सरकावून त्‍याची गाठ घट्ट केली गेली आणि त्‍यासरशी त्‍यांच्‍या घोषणा थांबल्‍या.

४. संपूर्ण कारागृहातील वातावरण आणि स्‍थिती

त्‍या घोषणा थांबताच सगळीकडे स्‍मशानशांतता पसरली. संपूर्ण कारागृहातील बंदिवान पुढे काय ऐकू येते, त्‍याच्‍याकडे आतुरतेने कान लावून बसले. तुरुंगाचे सर्व वातावरणच या वेळी इतके सुन्‍न असते की, लांब अंतरावर असणार्‍या फाशीच्‍या तख्‍ताच्‍या वजनदार फळीचा ती खाली पडतांना होणारा आवाजही तुरुंगभर ऐकू येतो. आताही तख्‍तावरील खटका ओढण्‍यात येताच फाशीच्‍या तख्‍ताखालची चाके फिरली आणि भगतसिंग प्रभृतींच्‍या पायाखालची फळी खाली पडल्‍याचा धाडकन आवाज झाला. भगतसिंग, राजगुरु नि सुखदेव यांचे देह फासावरून खाली मृत्‍यूच्‍या खोल दरीत लटकू लागले ! त्‍या वेळी सायंकाळचे ७ वाजून ३३ मिनिटे झाली होती. थोड्याच वेळात ते गतप्राण झाले. मातृभूमीसाठी असा प्रदीर्घ लढा देऊन अशा धैर्याने फाशी जाऊन त्‍यांनी स्‍वतःचे नाव जगभर दुमदुमत ठेवले. असा नेटाचा लढा एक क्षणभरही फाशीच्‍या शिक्षेला न घाबरता इतक्‍या दीर्घकाळपर्यंत त्‍याआधी कुणी दिला नव्‍हता ! अशा एकेका लोकोत्तर पुरुषामुळेही त्‍याच्‍या राष्‍ट्राचे नाव ‘तेजस्‍वी राष्‍ट्र’ म्‍हणून इतिहासात दुमदुमत रहाते !’

(साभार : ‘वडवानल’ या पुस्‍तकातून, लेखक : वि.श्री. जोशी)