मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर !

  • धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने घट

  • टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

सांगली, १५ मार्च (वार्ता.) – लोकसभा निवडणुकीची सिद्धता युद्धपातळीवर चालू असतांना यंदाच्या निवडणुकीवर दुष्काळाचे गडद सावट जाणवू लागले आहे. निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी हे सूत्र निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही वेगाने अल्प होत असून पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

आठवडाभरात झालेल्या मंत्रीमंडळाच्या २ बैठकांमध्ये निवडणूक समोर ठेवून डझनवारी निर्णय घेण्यात आले; परंतु दुष्काळी परिस्थितीचा उल्लेखही झाला नाही. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये राज्यात केवळ ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतील मिळून १५ गावे आणि ४४ वाड्या यांमध्ये १९ टँकरने पाणीपुरवठा चालू होता. त्या तुलनेत यंदाची परिस्थिती भीषण असल्याचे आकडेवारीवरून दिसते. शासकीय आकडेवारीनुसार सध्या राज्यातील ७१८ गावे आणि १ सहस्र ८८३ वाड्या यांना ८८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे.

मराठवाड्यात २२.४८ टक्के साठा !

लातूर जिल्ह्यात केवळ एका गावाला टँकरने पाणीपुरवठा चालू असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते; परंतु लातूरसारख्या शहरात आठवड्यातून केवळ १ दिवस पाणीपुरवठा होत आहे. लातूरसह जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतही पाणीप्रश्न गंभीर बनू शकतो. मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या एकूण ९२० प्रकल्पांमध्ये २२.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तिथे ४७.९५ टक्के पाणीसाठा होता.

टँकरची संख्या वाढवावी लागेल !

पालघर जिल्ह्यातील ६ गावे आणि २७ वाड्या यांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. नाशिक जिल्ह्यात १८४ गावे आणि ४०६ वाड्या, जळगावमधील २६ गावे, तसेच नगर जिल्ह्यातील ३८ गावे आणि २१० वाड्या यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. पुणे जिल्ह्यात ३३ गावे आणि २४६ वाड्या, सांगली जिल्ह्यात ६८ गावे आणि ४८९ वाड्या, सोलापूर जिल्ह्यात ६ गावे आणि ५७ वाड्या यांना टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ११९ गावे आणि २९ वाड्या, जालना येथील १०३ गावे आणि ४० वाड्या यांना टँकर चालू झाले आहेत. बुलढाणा येथेही १० गावांना टँकरने पाणीपुरवठा चालू असून सरकारी आकडेवारीनुसार नागपूर आणि अमरावती विभागांत अद्याप टँकरची आवश्यकता भासलेली नाही.

सांगली जिल्ह्यात पाण्यावरून संघर्षाची स्थिती !

विभागात जिल्हानिहाय पाणी प्रश्नाचे स्वरूप गंभीर आहे. पाण्यावरून संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते, अशीही अनेक ठिकाणे आहेत. सांगली जिल्ह्यात आताच तशी परिस्थिती निर्माण झाली असून काँग्रेस पक्षाने २ दिवसांपूर्वी पाण्यासाठी मोर्चा काढला होता. पाण्याचे राजकारण केले जाते आणि कोयना अन् वारणा धरणांतील पाणी मिळण्यासाठी सांगलीतील नागरिकांना याचना करावी लागत असल्याचा आरोप मोर्च्याद्वारे करण्यात आला.


सोलापूरसाठी दुष्काळ आणि पाणीटंचाई यांच्या निवारणार्थ १० कोटी ७९ लाख रुपयांचा निधी संमत !

सोलापूर – जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाई यांच्या अनुषंगाने सोलापूर महापालिका आणि जिल्ह्यातील १७ नगरपालिकांना क्षेत्रातील पाणीटंचाईच्या निवारणार्थ एकूण १० कोटी ७९ लाख रुपये निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने संमत करण्यात आला आहे. यांपैकी ५ कोटी १७ लाख रुपये निधी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना’ आणि ५ कोटी ६२ लाख रुपये निधी ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान, (जिल्हास्तर) अंतर्गत संमत करण्यात आला आहे.

‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने’च्या अंतर्गत शहरातील विविध भागांत आणि नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नवीन वाहिनी टाकणे, विविध कूपनलिका खोदणे-बांधणे, नवीन हौद बांधणे आदी कामे करण्यात आली आहेत. पंढरपूर येथील ६५ एकर येथे वारकर्‍यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आणि मल:निसारण व्यवस्था यांसाठी ३ कोटी ९३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.