संपादकीय : अनैतिकतेकडून राष्ट्रोत्कर्षाकडे…!

केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नुकताच राष्ट्रहितकारक निर्णय घेतला आहे. देशातील १८ ओटीटी मंचांवर (प्लॅटफॉर्मवर) बंदी घातली आहे. कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणारी १९ संकेतस्थळे, १० ॲप्स, ओटीटी मंचांची सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती (सोशल मिडिया हँडल्स) बंद करण्यात आली आहेत. हे जरी स्तुत्य असले, तरी ते एकांगीच आहे; कारण आणखी असे ७०० ओटीटी ॲप्स अस्तित्वात आहेत, ज्यांवरून अश्लीलतेचे उघड प्रसारण केले जाते. त्या माध्यमांतून अश्लीलतेचे संकट पुन्हा देशावर ओढवणार आहेच. त्यामुळे केवळ १८ मंचांवर बंदी आणून पुरेसे होणार नाही, तर ७०० मंचच कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत. त्यासाठी सरकारने पाठपुरावा घ्यायला हवा. ७०० मंच बंद करण्यासाठी आपण पावले उचलत असू, तर दुसरीकडे नवीन मंचांची निर्मिती होत असल्यास त्याकडेही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे ओटीटीच्या सूत्राकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. हे वेळीच केले नाही, तर भारताचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही. सद्यःस्थितीत निर्माण झालेला या ओटीटी मंचांचा सुळसुळाट काही प्रमाणात तरी रोखायलाच हवा.

परिनिरीक्षण मंडळ हवे !

‘ओटीटी’ मंचाचे उगमस्थान ठरला कोरोना महामारीचा काळ ! त्या काळात कुणीही घराबाहेर पडू शकत नसल्याने ४ भिंतींच्या आत ओटीटीच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले जाऊ लागले. अमर्याद ज्ञानाची विविध क्षेत्रे सर्वांसाठी खुली करण्यात आली. अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणात लोक यांकडे आकर्षित होऊ लागल्याने या मंचांशी संबंधित असणार्‍यांचे खिसेही भरले गेले. झटपट प्रसिद्धीच्या जगात आपण तोट्यात जाऊ नये, तसेच सर्व मंचांना आपल्याला टक्कर देता यावी, यासाठी काही मंचांनी माहितीजन्य ज्ञानाच्या जोडीला अयोग्य गोष्टींची कास धरून ते दाखवण्यास प्रारंभ केला. येथेच त्यांचे चुकले.

भारत हे ज्ञानाचे मोठे भांडार आहे. पूर्वापार काळापासून भारतात संस्कृती, परंपरा, धर्म, नीतीमूल्ये अस्तित्वात आहेत. वेद, पुराणे, धर्मग्रंथ हे तर भारताचे आधारस्तंभ आहेत. ऐतिहासिक, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक या क्षेत्रांतील विविध विषयांमध्ये भारत देश पारंगत आहे. महापुरुष, राष्ट्रपुरुष, आदरणीय, वंदनीय, पूजनीय अशी अनेक महान व्यक्तीमत्त्वे भारतात होऊन गेली आहेत आणि वर्तमानातही अस्तित्वात आहेत. हे सर्व सोडून हे ओटीटी मंच अश्लीलता किंवा अनैतिकता यांच्या मागे का लागतात ? आणि धुरंधर भारताला विनाशाच्या खाईत का लोटतात? बरे, असे करणार्‍यांवर कारवाई करण्याचे प्रावधानही कायद्यात नमूद नाही. त्यामुळे अशांचे फावते. कारवाईच्या भीतीने किंवा बडग्याने आपसूकच या दृश्यांवर मर्यादा येऊ शकते. ओटीटी मंचांसाठी कायदा, नियमावली यांचा अवलंब करणे, ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.

सर्वंकष विचार केला, तर मंचांवर बंदी घालणे हा केवळ एकमेव उपाय नाही, तर व्यभिचारी, अनैतिक, अश्लील दृश्यांना कात्री लावणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. चित्रपटांसाठी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ असते, नाटकांतील अयोग्य दृश्यांवरही वेळप्रसंगी नियंत्रण आणले जाते. अशी पद्धत ओटीटीसाठी का लागू केली जात नाही ? सरकार या दृष्टीने विचार करील का ? त्या अनुषंगाने काही निकष ठरवेल का ? त्यांच्या स्वैरपणाला वेसण घालणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सध्या दाखवली जाणारी भडक, हिंसक, वासनांध दृश्ये पाहून भावी पिढी तसेच अनुकरण करू पहाते. पालकांनाही प्रश्न पडतो, ‘मुलांसमोर काय बघावे आणि काय लपवावे ?’ एक माध्यम टाळले, तरी दुसरे माध्यम तेच स्वरूप घेऊन आपल्यासमोर उभे ! अशा वेळी करायचे तरी काय ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बलशाली भारतातील तरुणाईही खर्‍या अर्थाने बलशाली असणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही. तरुण पिढीच्या दृष्टीत राष्ट्रोत्थान नव्हे, वासनांधता, हिंसकता भरलेली आहे. हे बलशाली होऊ पहाणार्‍या भारतासाठी लाजिरवाणे आहे.

सरकारने १८ मंचांवर बंदी घातली आणि त्यानंतर अनेक नागरिकांनी यासाठी सरकारचे अभिनंदनही केले; पण त्याच जोडीला व्यभिचार किंवा अश्लीलता दाखवणारी आणखी कोणती माध्यमे आहेत की, त्यांच्यावरही बंदी घालणे आवश्यक आहे, अशांचाही नागरिकांनी आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे सरकारने नागरिकांचे मत विचारात घेऊन त्या अनुषंगाने कृती करायला हवी. असे झाल्यास तो निर्णय खर्‍या अर्थाने राष्ट्रहितावह ठरू शकतो. सरकार आपल्या मतांची नोंद घेते, हे लक्षात आल्यावर नागरिकही राष्ट्ररक्षणासाठीच्या कार्यात आणखी पुढाकार घेतील. हे भारतासाठी आश्वासक ठरेल.

नैतिक अधिष्ठान आणि संस्कारांची शिदोरी !

ओटीटी मंचांनी सर्वत्र आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या वर्चस्वातही त्यांनी मनोरंजनात्मक आणि कलात्मक अधिष्ठान टिकवायला हवे. जानेवारी २०२४ मध्ये श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी ओटीटी मंच पूर्णपणे राममय झाला होता. श्रीरामाशी संबंधित कार्यक्रमच त्यावरून दाखवले जात होते. असे स्वरूप प्रतिदिनच असायला हवे. दृश्यांची आशयघनता आणि अद्वितीय प्रतिभा त्यांनी टिकवून ठेवायला हवी. शब्दसंपदाही मोहून टाकेल, अशी असायला हवी. या सर्वांचा आविष्कारच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो. भारत हा विश्वगुरु आहे. संपूर्ण जगासाठी भारत वंदनीय आहे. तो आदर्श संस्कृतीचा दीपस्तंभ आहे. असे असतांना अशा भारतात अनैतिकता, अश्लीलता यांचा आगडोंब उसळणे हे लज्जास्पदच आहे, तसेच वाईट, अयोग्य, तसेच धर्म-संस्कृती यांना गालबोट लावणारे आहे. आज देश जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर आहे. त्याची पावले झपझप पडत आहेत; पण हीच गतीमान पावले भरकटतही आहेत. अनिर्बंध वर्तणूक करत आहेत. मानवोद्धार तर दूरच; पण मानवाची अधिकाधिक हानी करण्याकडेच त्यांचा कल आहे. हे रोखण्यासाठी संस्कारांची शिदोरी असणे आवश्यक आहे. ही शिदोरी तरुणपणी मिळाली, तरी काहीही उपयोगाचे नाही. ती बालवयातच मिळणे महत्त्वाचे आहे. भारताने स्वतःचे नैतिक अधिष्ठान टिकवले, तरच तो विश्वगुरु पदास पात्र ठरेल. त्यामुळे केवळ सरकारनेच नव्हे, तर नागरिकांनीही देशाला वैचारिकदृष्ट्या कंगाल करू पहाणार्‍यांच्या विरोधात संघटित होऊन राष्ट्रकर्तव्य पार पाडावे !

येणार्‍या काळात भारताने स्वतःचे नैतिक अधिष्ठान टिकवले, तरच तो विश्वगुरु पदास पात्र ठरेल !