रत्नागिरी – दापोली तालुक्यातील मुरुड येथील ‘साई रिसॉर्ट’ अनधिकृत असल्याने ते पाडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. येत्या ४ आठवड्यांत हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि सदानंद कदम यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
‘साई रिसॉर्टचे बांधकाम हे ‘सी.आर्.झेड.’ कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आले असून यात ‘मनी लाँड्रिंग’ केले आहे’, आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. साई रिसॉर्टशी संबंधीत प्रकरणी ‘ईडी’कडून अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी करण्यात आली होती.
या अगोदर खेड जिल्हा न्यायालयाने साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट आधी अनिल परब यांचे असून त्यांनी त्यांचे मित्र उद्योजक सदानंद कदम यांना विकले होते. या रिसॉर्टच्या बांधकामात अनेक त्रुटी आणि नियमभंग झाल्याने रिसॉर्ट पाडण्याचे आदेश येथील जिल्ह्याधिकारी यांनी दिले होते.
या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या समितीने रिसॉर्टची पहाणी केली होती. ‘सी.आर्.झेड.’ नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम हे न्यायालयात गेले होते. आता न्यायालयाने रिसॉर्ट पाडण्याचा आदेश दिला आहे.