जातीच्या आधारावर होणार्‍या भेदभावाला केवळ वर्णव्यवस्थाच उत्तरदायी नाही !

मद्रास उच्च न्यायालयाची उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माला संपवण्याच्या प्रकरणावर टिप्पणी

चेन्नई (तमिळनाडू) – समाजात जातीच्या आधारावर भेदभाव आहे आणि तो दूर करणे आवश्यक आहे, यावर आमचा विश्‍वास आहे. आज आपल्याला ठाऊक असलेल्या जातीव्यवस्थेचा इतिहास एका शतकापेक्षाही अल्प आहे. त्यामुळे जातीच्या आधारावर समाजात निर्माण झालेली विभागणी आणि भेदभाव यासाठी केवळ वर्णव्यवस्थेलाच उत्तरदायी ठरवता येणार नाही, अशी टीप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानावर प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना केली.

न्यायमूर्ती अनिता सुमंत म्हणाल्या की,

१. तमिळनाडूमध्ये ३७० नोंदणीकृत जाती आहेत. वेगवेगळ्या जातींमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होते; पण याचे कारण केवळ जातच नाही, तर त्यांना मिळणारे लाभही आहेत. अशी परिस्थिती असताना संपूर्ण दोष केवळ प्राचीन वर्णव्यवस्थेवर कसा टाकता येईल ? याचे उत्तर शोधले, तरी मिळणार नाही.

२. जातीच्या नावाखाली लोक एकमेकांवर आक्रमणे करत असल्याचे इतिहासातही घडत आले आहे. जुन्या काळातील या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी सातत्याने सुधारणा करणे आवश्यक आहे. आत्मनिरीक्षण झाले पाहिजे आणि भेदभाव कोणत्या मार्गांनी दूर करता येईल, याचा विचार केला पाहिजे.

३. वर्णव्यवस्था जन्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. हे लोकांच्या कामावर किंवा व्यवसायावर आधारित होते. समाजाचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून ही व्यवस्था करण्यात आली. येथे लोकांची ओळख त्यांच्या कामावरून होते. आजही लोक केवळ कामाच्या जोरावर ओळखले जातात.