पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी घेतली आठवड्यामध्ये दोनदा स्थायी समितीची बैठक !

पिंपरी-चिंचवड – आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुक्त, तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी आठवड्यामध्ये दोनदा स्थायी समितीची बैठक घेतली. या बैठकांमध्ये अनुमाने ३५० कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती दिली आहे. महापालिकेमध्ये १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट चालू आहे. आयुक्त हेच प्रशासक म्हणून कारभार पहात आहेत. आगामी काळात आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेल्या स्थायी समितीच्या दोन बैठकींत १९४ विषयांच्या ३५० कोटी रुपयांच्या खर्चाला संमती दिली आहे. यामध्ये पिंपरी चौक ते हॅरिस पूल येथे रस्ता विकसित करणे, मोशी येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरात शंभूसृष्टी उभारणे, भक्ती-शक्ती ते मुकाई चौक बी.आर्.टी. मार्ग विकसित करणे, महापालिका मुख्य इमारतीतील अंतर्गत आणि बाह्य दैनंदिन स्वच्छता कामे करणे, थेरगाव येथे बहुउद्देशीय इमारत बांधणी यांसह विविध विषयांना संमती दिली आहे.