घणसोलीतील ८ वर्षांपूर्वीचे अनधिकृत मदरशाचे बांधकाम हटवले !

वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि पोलीस यांचे दुर्लक्ष

नवी मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – घणसोलीतील (तळवली) सिडकोच्या वाणिज्य भूखंडावरील मदरशाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार स्थानिक रहिवासी तेजस पाटील यांनी केली होती. त्यानुसार सिडको आणि महापालिका यांच्या अधिकार्‍यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना कारवाईची नोटीस बजावली होती. कारवाईची चेतावणी दिल्यावर अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम नुकतेच हटवले. मागील ८ वर्षांपासून हे बांधकाम त्या ठिकाणी होते. सकल हिंदु समाजाच्या वतीनेही या संदर्भात तक्रार केली होती.

घणसोली अंतर्गत तळवली येथे सिडकोच्या सेक्टर २५ मध्ये व्यावसायिक भूखंडावर राजरोसपणे अतिक्रमण करून त्यावर मदरशाचे बांधकाम केले होते. याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, विभाग अधिकारी, स्थानिक पोलीस ठाणे यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली होती; पण प्रशासनाने इतकी वर्षे याकडे दुर्लक्ष केले होते. अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यास आंदोलनाची चेतावणीही देण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

अनधिकृत बांधकामाकडे ८ वर्षे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांना बडतर्फच करायला हवे !