कोणत्याही देशाला जर आपल्या सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील, तर नेहमीच ६ आघाड्यांवर देश बलशाली असणे, हे आवश्यक असते.
अ. पहिले म्हणजे देशाचे सैन्य हे बलशाली, कर्तव्यदक्ष आणि आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असले पाहिजे.
आ. दुसरे म्हणजे देश आर्थिकदृष्ट्या भक्कम असला पाहिजे.
इ. तिसरे म्हणजे देशांतर्गत सामाजिक बंधुभाव, सौहार्द आणि देशप्रेम असले पाहिजे.
ई. चौथे सूत्र म्हणजे कोणत्याही मार्गाने देशाच्या लोकसंख्येमधील धर्मीय गुणोत्तर कायम राखले गेले पाहिजे. (हे सूत्र भारतासारख्या बहुधर्मीय अन् निधर्मी अशा देशांकरताच लागू होते.)
उ. पाचवे सूत्र म्हणजे देशाची शिक्षण व्यवस्था स्वतंत्र आणि स्वायत्त असली पाहिजे.
ऊ. सहावे सूत्र म्हणजे देशाच्या संस्कृतीची जोपासना केली गेली पाहिजे.
या गोष्टी परस्परावलंबी असतात. या सर्वांचा सुवर्ण मध्य साधत, कालानुरूप या सूत्रांचा अग्रक्रम लावतच, राष्ट्राची जडणघडण होत असते. अर्थात् देशाच्या नेतृत्वाने यासाठी नेहमीच जनतेपुढे एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१. जनतेच्या मनातील ‘देशप्रेम’च राष्ट्रापुढील अनेक समस्यांचे निराकरण करते !
अत्यंत सजगपणे समाजात आणि देशात सतत होणार्या पालटांचा, सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांचा अभ्यास करून देशहिताच्या दृष्टीने त्याला दिशा देण्याचे कार्य नेतृत्वाने करणे आवश्यक असते. देशाला वा समाजाला, राष्ट्रहिताची दिशा आणि दीक्षा देण्यात जर नेतृत्व यशस्वी झाले, तर जनतेच्या मनात देशप्रेम निर्माण होते. हेच ‘देशप्रेम’ मग राष्ट्रापुढील अनेक समस्यांचे सहजपणे निराकरण करते.
२. संस्कृती जोपासण्याचे दायित्व समाजधुरिण आणि विचारी लोक यांवरच अवलंबून !
आजच्या घडीला आपल्या देशाचे नेतृत्व पहिल्या ३ सूत्रांवर (शिरोभागातील ३ सूत्रांवर) अत्यंत आक्रमकतेने काम करतांना दिसत आहे. चौथ्या सूत्रावर म्हणजे लोकसंख्येशी संबंधित विषयांवर कदाचित् सरकारी यंत्रणा काम करत असतीलही; परंतु अद्याप ते दिसून येत नाही. पाचवे सूत्र म्हणजे राष्ट्रीय आणि स्वायत्त शिक्षण व्यवस्थेचा, तर त्यावरही पुनर्बांधणीचे काम चालू आहे. सहाव्या सूत्राचे म्हणजे संस्कृती जोपासण्याचे दायित्व मात्र समाजधुरिण आणि विचारी लोक यांवरच असते, हे लक्षात घेतले पाहिजे.
३. देशाची स्वयंपूर्ण शिक्षणपद्धत संपवून ‘मेकॉलेप्रणीत’ शिक्षणपद्धत लादणे !
या देशाची संस्कृती पालटण्यासाठी वसाहतवादी मानसिकतेचे किमान १५० वर्षांपासून प्रयत्न चालू असतांना दिसतात. यासाठी सर्वप्रथम आमची स्वयंपूर्ण अशी शिक्षणपद्धत संपवण्यात आली आणि मग आमच्यावर ‘मेकॉलेप्रणीत इंग्रजी’ शिक्षणपद्धत लादली गेली. खरे शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षण, हेच समाजमनावर रुजवण्यात आले. सगळ्या हिंदु समाजाने पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करावे, युरोपीय जीवनप्रणाली स्वीकारत स्वत्व विसरून जावे, यासाठी प्रयत्न केले गेले.
४. मंदिरांवर आघात करून जीवनाभिमुख हिंदु संस्कृती विकृत करण्याचे प्रयत्न !
आमच्या संस्कृतीवर आक्रमण केले गेले. आमच्या पूर्वजांनी सहस्रो वर्षे कष्ट करून जीवनाभिमुख, अशी जी हिंदु संस्कृती निर्माण केली, तिला विकृत करण्याचे प्रयत्न केले गेले आणि आजही हे प्रयत्न चालूच आहेत. सर्वप्रथम हिंदु समाजाची मंदिरांशी असलेली श्रद्धा संपवण्यात आली. कोणत्याही संकटकाळात, समाजातील कोणत्याही घटकाला आमची मंदिरे साहाय्याचा हात देतात. ‘गावांसाठी मंदिर आणि मंदिरासाठी गाव’, अशी परस्परावलंबी व्यवस्था होती, हे लक्षात घेतले पाहिजे. सगळ्या मंदिरांची व्यवस्था आणि पूजा करणारे पुजारी ब्राह्मण नसत आणि नसतात, हेही इथे सांगितले पाहिजे. आमच्या समाजाला मंदिरापासून तोडून आमच्या श्रद्धेला पहिला सुरुंग लावला गेला. आज गावागावांतून मंदिरांविषयी श्रद्धा असणारा वर्ग लुप्त झालेला दिसतो.
५. एकत्र कुटुंबपद्धतीचे विभक्त कुटुंबांमध्ये रूपांतर !
हिंदु समाज आपल्या कुटुंबव्यवस्थेच्या आधारे भक्कमपणे उभा होता. या कुटुंबव्यवस्थेला लक्ष करण्यात आले. यासाठी अवास्तव अशा स्त्रीवादाची पाठराखण करण्यात आली. हिंदू ‘स्त्री’ची देवतेचे स्वरूप म्हणून पूजा करतात. हिंदु धर्मातील स्त्री नेहमीच स्वतंत्र आणि आदरणीय अशी असतांना, तिथेही शोषक पुरुष आणि शोषित स्त्री असे चित्र रंगवण्यात आले. त्यामुळे आमच्या कुटुंबव्यवस्थेचा कणा असलेली स्त्री अनेक ठिकाणी स्वतःला शोषित समजू लागली. आर्थिक स्वातंत्र्याच्या नावाखाली आमचे कुटुंब आणि कुटुंबव्यवस्था कमकुवत झाली.
६. व्यक्तीस्वातंत्र्याचा फोलपणा
एकमेकांशी जुळवून घेणे, मतभिन्नता असली, कर्तृत्वात कुठे अधिक-उणे असले, तरीही ज्येष्ठांचा मान राखणे, सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे रहाणे, नातेवाईक, आप्तस्वकीय यांच्यासहित कुटुंब आणि समाज यांचा गाडा ओढण्यात योगदान देणे, हे आपल्या समाजातून लोप पावतांना दिसत आहे. याचे कारण आमचा समाज आणि कुटुंब व्यक्तीस्वातंत्र्याच्या आवरणाखाली आत्यंतिक उच्छृंखल होत आहे.
७. विवाहातील कार्यक्रमांचे पालटते स्वरूप
‘विवाह संस्कार’ हा आमच्या कुटुंबव्यवस्थेचा एक आधार आहे. विवाह विधी आणि संस्कार, तसेच त्यातील पावित्र्य अन् गांभीर्य नष्ट होऊन आज त्याचे स्वरूप पालटत आहे. गाण्याच्या बैठकीऐवजी ‘संगीत’ या नावाखाली वय ७० वर्षे पार केलेल्या आजी-आजोबांपासून ५ वर्षांच्या चिमण्या मुलांपर्यंत ‘डान्स’ म्हणून ओंगळवाणे नाचणे चालू झालेले दिसते.
८. धार्मिक सोहळ्यातील अयोग्य गोष्टी
अ. आजकाल लग्नादी कार्यात स्त्रियांना साडी नेसवण्यासाठी पैसे देऊन पुरुष बोलावले जातात. साडी हा मुळात स्त्री वेश असतांना पुरुष चांगली साडी नेसवून देऊ शकतात (?), हाही एक आश्चर्यकारक प्रश्नच आहे.
आ. अनेकदा वधू किंवा वर यांना विवाहस्थळी येण्यासाठी विलंब होण्याचे कारण ‘वेडिंग मेकअप’च्या (लग्नासाठी केलेल्या श्रृंगाराच्या) नावाखाली दोघांच्याही चेहर्यावर चढवण्यात येणारे ‘मेकअप’चे थर असतात. चांगले दिसावे, दिसलेही पाहिजे; पण त्यासाठी होणार्या धावपळीत कौटुंबिक विधी किंवा संस्कार यांना तिलांजली देणे योग्य नाही, हे आपण सोयीस्कर विसरत आहोत. विवाहाकडे ‘संस्कार’ म्हणून पहाण्याऐवजी आपण एक ‘इव्हेंट’ (कार्यक्रम) म्हणून केव्हा पाहू लागलो ? हे आपल्यालाच कळले नाही. याचा परिणाम म्हणजे विविध बाजारू ‘एजन्सीज्’ यांनी आपले विविध विधी आणि संस्कार यांवर नियंत्रण मिळवले आहे.
इ. सगळ्यांना सोयीस्कर म्हणून आपण सर्रास ‘बुफे’ (अनेक पदार्थांपैकी आपल्याला हवा तो पदार्थ कितीही घेऊन हवे तिथे बसून खाणे) आयोजन करू लागलो आहोत. काळाच्या ओघात ते अपरिहार्यही झाले आहे; पण परिणाम म्हणजे आज घरातील स्त्रियांनाही जेवणाचे ताट वाढण्याच्या असलेल्या शास्त्रीय पद्धतीची माहिती/जाण राहिलेली नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भोजन हा एक ‘सोहळा’ न रहाता अश्लाघ्य श्रीमंतीचे प्रदर्शन आणि अनावश्यक उधळपट्टी करणारा ‘इव्हेंट’ झाला आहे.
ई. आमच्या विवाह कार्यात छायाचित्रकार (फोटोग्राफर) आणि ध्वनीमुद्रितकार (व्हिडीओग्राफर) जणू या विधींचे दिग्दर्शक झाले आहेत. त्यांना छायाचित्रासाठी चांगला ‘अँगल’ मिळावा, म्हणून विधी वारंवार (रिटेक) करायला सांगितले जातात. दुर्दैवाने या बाजारू व्यवस्थेचा भाग म्हणून विवाह संस्कार करणार्या गुरुजींना/पुरोहितांना छायाचित्रात किंवा चलचित्रात आपण चमकलेच पाहिजे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे कोणत्याही विधींचे फोटो काढण्यासाठी तो विधी करणार्याला सतत सूचना करतांना संस्कारांच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष केले जाते.
उ. जग जवळ आले की, संस्कृती संकर काही प्रमाणात होणार, हे मान्य करावेच लागते; पण इतर धर्मियांच्या प्रथा-परंपरांचे अनुकरण करतांना योग्य-अयोग्य हा विचार होतांना दिसत नाही. अनेक गोष्टी नावीन्य म्हणून, एकदाच होणार म्हणून, कुणाची तरी हौस म्हणून करतांना सांस्कृतिक गाभ्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
ऊ. याहूनही अधिक गंभीर गोष्ट अशी की, या सर्व सेवा देण्यासाठी परधर्मीय लोकांना आम्ही कंत्राट देत आहोत. ‘लग्न एकदाच होते’, या नावाखाली हे परधर्मीय लोक आमच्या विधींचे पावित्र्य नष्ट करतांना दिसत आहेत. आपण लक्षात घेतले पाहिजे की, हेच परधर्मीय ‘इव्हेंन्ट मॅनेज’ (कार्यक्रमाचे आयोजन) करण्यासाठी आपल्याकडून भरगच्च पैसे घेऊन स्वतः श्रीमंत होत आहेत.
९. वडीलधारी मंडळींची धृतराष्ट्र-गांधारी वृत्ती !
हे सगळे आपल्या आजूबाजूला घडत असतांना कुटुंबातील आई-वडिलांसह सर्व वडीलधारी, सधन मंडळी डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प बसून आहेत. कुणीही आजी, आत्या, मामी, मावशी, आई ‘मी साडी नेसवून देते, ही थेर बंद करा,’ असे म्हणतांना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या नावाखाली सांस्कृतिक अध:पतन, स्वैराचार किंवा उच्छृंखलपणाला विरोध होतांना दिसत नाही.
१०. संस्कृती जोपासना हेच संस्कृतीरक्षण !
हाच प्रकार अन्य हिंदु सणवार साजरे करतांना होत असलेला दिसतो. आमची आताची पिढी ही तरुण पिढीसमोर आदर्श उभे करू शकली नाही, ही जाणीव अधिक व्यथित करणारी आहे. आजच्या काळात संस्कृतीरक्षण आणि जोपासना ही अत्यंत महत्त्वाची, गंभीर अन् नाजूक अशी गोष्ट झाली आहे. युरोप आणि मध्यपूर्वेतून सातत्याने होणार्या सांस्कृतिक आक्रमणांचा विरोध करणे आवश्यक आहेच; परंतु संस्कृती अन् परंपरा यांच्या नावाने आमचे विविध संस्कार, विधी यांमध्ये अवैज्ञानिक, तसेच ख्रिस्ती आणि इस्लामिक प्रथा आधुनिकतेचा बुरखा घालून घुसवण्यात येत आहेत, त्याकडेही सजगतेने लक्ष देणे आवश्यक आहे; अन्यथा पूर्ण वेगात घडत असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आमची संस्कृती गिळंकृत केल्याविना रहाणार नाही.
– डॉ. विवेक राजे
(साभार : दैनिक ‘तरुण भारत, नागपूर)
संपादकीय भूमिकाआजच्या काळात संस्कृतीचे रक्षण आणि जोपासना करणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी स्वतःपासूनच प्रारंभ करायला हवा ! |