‘१८.२.२०२४ या दिवशी ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या लघुग्रंथाचे त्यांच्या निवासस्थानी लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याची मला जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर वायूमंडलातील निर्गुण तत्त्व वाढणे
पू. अनंत आठवले यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच वायूमंडलातील निर्गुण तत्त्वात वाढ झाली. त्यामुळे पूर्ण कार्यक्रमात माझ्या देहाला हलकेपणा आणि मनाला उत्साह जाणवत होता.
२. ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या लघुग्रंथाचे लोकार्पण केल्यावर वायूमंडलातील आनंदाचे प्रमाण वाढणे
पू. अनंत आठवले, पू. पृथ्वीराज हजारे (सनातनचे २५ वे (व्यष्टी) संत), सौ. सुनीती आठवले (पू. अनंत आठवले यांच्या पत्नी) आणि श्री. विजय आठवले (पू. अनंत आठवले यांचे सुपुत्र) यांनी लघुग्रंथाचे लोकार्पण केल्यावर लघुग्रंथातून प्रक्षेपित होणार्या आनंदाच्या स्पंदनांचे प्रमाण ३० टक्क्यांवरून ५० टक्के झाले. त्यामुळे पूर्ण वायूमंडलात सूक्ष्मातून गुलाबी रंगाची छटा पसरली.
३. ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
३ अ. ज्ञानयोगी पू. अनंत आठवले निर्विकार स्थितीत असणे : पूर्ण कार्यक्रमात पू. अनंत आठवले यांच्याकडे पाहिल्यावर माझे मन निर्विचार होत होते. ‘पू. अनंत आठवले यांचे निर्गुणाच्या दिशेने मार्गक्रमण होत असून ते योगी किंवा ऋषिमुनी यांच्या समाधीसारख्या म्हणजे निर्विकार स्थितीत असल्यामुळे ‘त्यांच्याकडे पाहिल्यावर मन निर्विचार होत आहे’, असे मला जाणवले.
३ आ. ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचे बोलणे ऐकतांना भावजागृती होणे : पू. अनंत आठवले त्यांचे मनोगत व्यक्त करत असतांना माझा भाव जागृत झाला. मला सूक्ष्मातून चंदनाचा सुगंध येऊन माझ्या मनाला गोडवा आणि पुष्कळ आनंदही जाणवला. ‘पू. अनंत आठवले शिवात्मा दशेत राहून बोलत असल्याने त्यांच्यात दडलेले भाव, चैतन्य आणि आनंद व्यक्त होत असल्यामुळे मला ही अनुभूती येत आहे’, असे मला जाणवले.
३ इ. वायूमंडलात सूक्ष्मातून भावाची निळसर छटा दिसणे : सौ. सुनीती आठवले, श्री. विजय आठवले आणि अन्य साधक त्यांना पू. अनंत आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती अन् मनोगत सांगत असतांना वायूमंडलात सूक्ष्मातून भावाशी निगडित निळसर छटा पसरली होती.
४. ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेला ग्रंथ आणि त्यांची उपस्थिती यांतून त्यांचे गुण दिसून येणे
ईश्वर सर्व गुणांनी परिपूर्ण असून त्याने बनवलेली सृष्टीही अनेक गुणांनी युक्त आहे. संत हे ईश्वराचे सगुण रूप असल्यामुळेपू. अनंत आठवले यांच्यात अहंशून्यता, प्रीती, श्रद्धा, आनंद, असे विविध ईश्वरी गुण आहेत. त्यामुळे त्यांनी लिहिलेले ग्रंथ किंवा त्यांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम यांतूनही त्यांच्यातील विविध आध्यात्मिक गुणांची सहजतेने प्रचीती येते.
५. कृतज्ञता
पू. अनंत आठवले यांना असणारे ज्ञान हे सूर्याच्या तेजाप्रमाणे आहे. मला असलेले ज्ञान हे दिव्यातील ज्योतीप्रमाणेही नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ज्ञानतेजाने युक्त पू. अनंत आठवलेरूपी सूर्याची मला असलेल्या अल्पशा ज्ञानज्योतीने आरती करण्याची संधी मिळाली. यासाठी दोन्ही संतश्रेष्ठांच्या (पू. अनंत आठवले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.२.२०२४, सकाळी ११ ते ११.२२)
|