मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाशी येथे विशेष कार्यक्रम

नवी मुंबई, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘उत्सव मराठी भाषेचा’ उपक्रम २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या सुलेखन प्रदर्शनात मराठी भाषेतील वाचनीय कथा, कविता, विचार यांचे सुलेखनातून प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

या प्रदर्शनात सुलेखनकार विद्यार्थ्यांच्या ४० कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज, ना.धों. महानोर, इंदिरा संत, शांताबाई शेळके अशा नामवंत कवींच्या कविता आणि वाचनीय साहित्य सुलेखनातून पहाण्याची संधी रसिकांना उपलब्ध होणार आहे. हे सुलेखन प्रदर्शन २४ घंटे खुले असणार आहे. या प्रदर्शनामध्ये २५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत सुलेखनकारांनी सुलेखन प्रात्यक्षिके सादर केली.