संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे उपासनास्थान सिद्धबेट (आळंदी) एक दुर्लक्षित ऊर्जास्रोत !

  • अनेक विकासकामे प्रलंबित

  • काही लोकांसाठी मद्य आणि मादक द्रव्य सेवनाचे ठिकाण बनले

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची सिद्धबेट येथील पर्णकुटी

आळंदी (पुणे) – येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली यांची संजीवन समाधी आहे. जगभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात; परंतु आळंदीमध्येच ‘सिद्धबेट’ नावाचे एक लहानसे बेट आहे. या ठिकाणी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि भावंडे यांनी पर्णकुटीत वास्तव्य करून साधना करत संतपद प्राप्त केले. आज मात्र हा भाग अतिशय दुर्लक्षित आहे. येथे सर्वत्र जंगल वाढले आहे. येथील नदी स्वच्छ नाही. तसेच काही स्थानिक लोकांसाठी ते मद्य पिण्याचे आणि मादक द्रव्य सेवन करण्याचे ठिकाण बनले आहे.

सिद्धबेट येथे लावलेला विकासकामाच्या खर्चाचा फलक

राज्य सरकारने वर्ष २०१५ मध्ये या परिसराच्या विकासासाठी साधारण साडेआठ कोटी रुपयांचा विकासकामांचा फलक लावला आहे. एकूण १८ मासांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र आज जवळजवळ ८ वर्षांचा काळ लोटला, तरीही येथे कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पर्णकुटी आजही पिंपळाच्या वृक्षाखाली एका झोपडीच्या स्थितीत आहे. यामुळे साडेआठ कोटी रुपयांचे काय झाले ? यात भ्रष्टाचार तर झाला नाही ना ? या पवित्र ठिकाणाचा गैरवापर का होत आहे ? असे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत.