राज्यातील गडकोटांच्या विकासाला चालना मिळेल ! – गिरीश महाजन, पर्यटनमंत्री  

 जुन्नर (जिल्हा पुणे) येथे भव्य ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ साजरा !

गिरीश महाजन

जुन्नर – मराठी साम्राज्याचा इतिहास राज्यातील ४०० हून अधिक गडकोटांभोवती फिरतो. आपल्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा होत आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ११ गटांचा समावेश असल्याने जगभरातून आपल्या देशात पर्यटक येतील आणि पर्यटन वाढेल. जिल्हा वार्षिक योजना (सी.एस्.आर्.) आणि पर्यटन यांसाठी प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून गडांच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जुन्नर शहरात ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ साजरा झाला त्या वेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या शिस्तबद्ध आणि आदर्श विचाराने मराठी साम्राज्याचा पाया रचला. ‘गनिमी कावा’ ही नवीन शैली विकसित केली.

या महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती आणि रांगोळी स्पर्धा, गिर्यारोहण, प्रदर्शन, हस्तकलाप्रदर्शन, खाद्य महोत्सव, मंदिर दर्शन, सरोवर निवास यांसारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून आपला इतिहास आणि संस्कृतीचे ज्ञान, तसेच आपल्या संस्कृतीचा अभिमान नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून अनुमती मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

पर्यटन धोरण वर्ष २०१६ अंतर्गत शिवनेरी गडाच्या विकासासाठी पर्यटन विभागाने अनेक निर्णय घेतले आहेत. जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. रायगड येथील गडांप्रमाणे शिवनेरी गडाचा विकास करण्याचे प्रयत्न चालू आहेत. राज्यातील गडांचा आंतरराज्य, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्याच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि शौर्याचे साक्षीदार असलेले गड २०२४ – २५ या वर्षाच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित संग्रहालय आणि थीम पार्क उभारले जाणार आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ संग्रहालय, छत्रपती संभाजीनगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वस्तूसंग्रहालय, तसेच नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज रॉयल आर्ट म्युझियम, राजाराम छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी, शिवनेरी येथे शिवसृष्टीची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, मराठा साम्राज्यातील गडकोट आणि त्यांच्या समृद्ध इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.