दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १० ते १२ वर्षांचा मुलगा दगड फोडतांना आढळला !; गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रक्कम जप्त; पण पोलीस तोतया असल्याचे उघड !…

१० ते १२ वर्षांचा मुलगा दगड फोडतांना आढळला !

यवतमाळ – येथे शासकीय निर्माणाधीन रस्ताकामात १० ते १२ वर्षांचा मुलगा दगड फोडतांना आढळला. भारतीय राज्यघटनेनुसार १४ वर्षांखालील मुला-मुलींना अल्प आर्थिक मोबदला देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून त्यांचा शैक्षणिक अधिकार हिसकावून त्यांना सामाजिक, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे हा कायद्याने गुन्हा असून यामध्ये कायद्यानुसार शिक्षेचे प्रावधान आहे.

‘बालमजूरमुक्त देश’ संकल्पना राबवणार्‍या सरकारला याविषयी काय म्हणायचे आहे ?


गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रक्कम जप्त; पण पोलीस तोतया असल्याचे उघड !

नागपूर – मध्यप्रदेशातून गुटखा विक्रीसाठी आणणार्‍याला कारवाईची धमकी देत त्याच्याकडून साडेचार लाख रुपये आणि गुटखा चोरला. या प्रकरणी तोतया पोलीस आणि ग्रामीण भागातील पोलीस यांच्यासह ५ जणांना तहसील पोलिसांनी अटक केली. आरोपींनी स्वत:ला तहसील पोलीस ठाण्याचे कर्मचारी असल्याचे सांगितले होते. कारवाई न करण्याचा बदल्यात १० लाख रुपयांची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणी गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !


आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रायगड येथे सोहळा !

मुंबई – निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले आहे. शरद पवार गटाने आयोगाला वडाचे झाड, कपबशी आणि शिट्टी ही चिन्हे निवडून दिली होती; मात्र आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह अंतिम केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रायगड येथे २४ फेब्रुवारी या दिवशी मोठा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येईल. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित रहातील.