मुळशी धरणाची उंची वाढवावी ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – मुळशी धरणाखालील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढणार्‍या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मुळशी धरणाची उंची वाढवावी, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्याच्या माध्यमातून होणार्‍या कामांसाठी सामंजस्याने उपाययोजनांवर कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले. धरणाची उंची एक मीटरने वाढवल्यास अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते. यासह धरणाच्या मृतसाठ्यामधील पाण्याचा वापर करता आल्यास पाण्याची वाढीव मागणीही पूर्ण होईल. टाटा पॉवर आस्थापनाच्या साहाय्याने या कामास प्राधान्य द्यावे, असे पवार यांनी सांगितले. धरणाची उंची वाढवल्यामुळे पाण्याखाली जाणार्‍या भूमीपैकी ८० टक्के भूमी टाटा पॉवर आस्थापनाच्या क्षेत्रातील असून ती विनामोबदला देण्याची विनंती करण्यात यावी; तर उर्वरित २० टक्के भूमी सरकारच्या वतीने अधिग्रहण करून भूमीधारकांना योग्य मोबदला द्यावा, असेही ते म्हणाले.