लातूरचे ५, तर नांदेड येथील ९ विद्यार्थी !
लातूर – लातूर विभागात शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाल्या आहेत. परीक्षा निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी शिक्षण मंडळाने समुपदेशनाची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. विभागीय शिक्षण मंडळाने नियुक्त केलेल्या ७ भरारी पथकांनी केलेल्या निरीक्षणात इंग्रजी विषयाच्या पेपरला १४ विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आले. यात लातूर येथील ५ आणि नांदेड जिल्ह्यातील ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. धाराशिव येथे कॉपी करतांना एकही विद्यार्थी आढळून आला नाही.
लातूर विभागांतर्गत लातूर, धाराशिव आणि नांदेड या ३ जिल्ह्यांत इयत्ता १२ वीसाठी २३८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा चालू आहेत. यामध्ये लातूर विभागातील २ लाख ३ सहस्र ७०२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या कालावधीत कोणताही संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी ७ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रावर ७ भरारी पथकांसह प्रत्येक केंद्रावर २ बैठी पथके नियुक्त करण्यात आले आहे. इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी लातूर १७, धाराशिव १०, तर नांदेड जिल्ह्यासाठी १९ अशा एकूण ४६ परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती लातूर विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली.