राज्यात बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी करणार्‍या ५८ विद्यार्थ्यांवर कारवाई !

कडक पावले उचलणार !

प्रतिकात्मक छायाचित्रं

पुणे – राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या परीक्षा केंद्रांमध्ये इंग्रजी विषयाच्या परीक्षेत कॉपी केल्याचे ५८ प्रकार उघडकीस आले आहेत.

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत. मंडळाच्या वतीने राज्यभरात पावणेतीनशे भरारी पथके नेमण्यात आली आहेत. इंग्रजी विषयाच्या परीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर सर्वाधिक म्हणजे २६ घटनांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागीय मंडळात १५ आणि लातूर विभागीय मंडळात १४, तसेच नाशिक २ आणि नागपूर १ अशा एकूण ५८ घटनांची नोंद झाली आहे. मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण विभागीय मंडळांतील परीक्षा केंद्रावर एकही कॉपीचा प्रकार घडला नसल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांची कॉपी करण्याची सवय मोडण्यासाठी प्रशासन कठोर उपाययोजना करण्यासह नैतिकता वाढवणार्‍या शिक्षणाचा अंतर्भाव केव्हा करणार ?