महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे निधन !

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर, तसेच एकनिष्ठ शिवसैनिक मनोहर जोशी (वय ८६ वर्षे) यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने २३ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजता निधन झाले. २२ फेब्रुवारीच्या रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शन कक्षावरील दैनिक ‘सनातन प्रभात’ पहातांना मनोहर जोशी

महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. ‘कोहिनूर’ची स्थापना, वर्ष १९७६ मध्ये मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर १९९१ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर १९९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष अशा प्रकारे त्यांनी अनेक पदे भूषवली होती.

सौजन्य : झी न्यूज 

जिवाला जीव देणारा निष्ठावंत शिवसैनिक मनोहर जोशी ! – उद्धव ठाकरे, ठाकरे गट

मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते. बेळगाव-कारवार सीमा आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासह मनोहर जोशी आणि दत्ता साळवीही होते. जिवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे आपले दुर्दैव आहे. मनोहर जोशी हे पहिल्या फळीतील शिवसैनिक होते. जोशी यांच्यासारख्या जीवाला जीव देणार्‍या शिवसैनिकांमुळे शिवसेना अनेक संकटांवर मात करून वेळोवेळी उभी राहिली.

शिस्तबद्ध आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशीसरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे शिस्तबद्ध आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

मनोहर जोशी यांचे हिंदुत्वाच्या कार्यात सदैव सहकार्य लाभले ! – रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी जोशी यांच्या निधनावर म्हटले की, मा. लोकसभा अध्यक्ष, मा. मुख्यमंत्री आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक मनोहर जोशी यांचे हिंदुत्वाच्या कार्यात सदैव सहकार्य लाभले.

मा. जोशी सरांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !