२ धर्मांमधील वाद संवेदनशीलरित्या हाताळण्याची उपजिल्हाधिकार्‍यांना सूचना ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण

पणजी, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – दक्षिण गोव्यात सां-जुझे-दि-आरियल (नेसाई) येथे एका खासगी जागेत १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी मातीचे गोळे फेकून आक्रमण केले होते. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी सां-जुझे-दि-आरियल पंचायतीच्या सरपंच लिंडा फर्नांडिस, उपसरपंच वालेन फर्नांडिस यांच्यासह एकूण २० जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. या घटनेविषयी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘राज्यात २ धर्मांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये. हे संवेदनशील प्रकरण व्यवस्थितरित्या हाताळावे, अशी सूचना संबंधित उपजिल्हाधिकार्‍यांना करण्यात आली आहे.’’


कायदा मोडणार्‍यांवर कारवाई करणे, हे सरकारचे कर्तव्य ! – समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई

पणजी – काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी सां-जुझे-दि-आरियल प्रकरणी २० जणांच्या विरोधात नोंद केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘सां-जुझे-दि-आरियल प्रकरणी पोलिसांनी अर्थात् राज्य सरकारने स्वेच्छा नोंद घेऊन गुन्हे नोंदवले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण करणार्‍यांवर कारवाई करण्ो हे सरकारचे कर्तव्य आहे. खासदार सार्दिन यांना गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्याचा अधिकार कुणी दिला? या प्रकरणी तणाव नको; म्हणून मी पोलीस किंवा रुग्णालय येथे गेलो नाही. मातीची ढेप माझ्यावर फेकल्याने कपाळावर सूज आली होती. मी रुग्णालयात गेलो असतो, तर हे प्रकरण आणखी वाढण्याची शक्यता असल्याने तेही मी टाळले. मी घरीच उपचार घेतले. खासदार सार्दिन यांना ‘सां-जुझे-दि-आरियल येथे बसवलेला पुतळा अनधिकृत आहे’, असे म्हणण्याचा अधिकार नाही. ज्या खासगी भूमीमालकाने शिवपुतळा बसवण्यासाठी जागा दिली आहे, त्यानेच १०० मीटरवर दुसर्‍या धर्माच्या लोकांनाही जागा देऊन तेथे सिमेंटचे बांधकाम केलेले आहे. शिवपुतळ्याच्या ठिकाणी कोणतेही काँक्रीटचे बांधकाम केलेले नाही, तर तेथे लोखंडी बांधकाम केलेले आहे. खासदार सार्दिन यांनी शिवपुतळा अनधिकृत म्हणण्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा जी अनधिकृत धार्मिक बांधकामे केलेली आहेत त्याविषयी बोलावे.’’


शिवरायांचा पुतळा बसवून आम्ही कोणतेही अनधिकृत काम केलेले नाही !

शिवप्रेमींनी जिल्हाधिकार्‍यांना कागदपत्रे सुपुर्द करून पत्रकारांना दिली माहिती

मडगाव – सां-जुझे-दि-आरियल येथे शिवरायांचा पुतळा बसवून आम्ही कोणतेही अनधिकृत काम केलेले नाही. २४ मीटर भूमीत शिवरायांचा पुतळा बसवण्यासाठी भूमीचे मालक सरताज मकंदर यांच्याकडून आम्ही ‘ना हरकत दाखला’ घेतलेला आहे. पुतळा उभारण्यासाठी मागील डिसेंबर मासात उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता; मात्र खासगी भूमीत पुतळा उभारण्यासाठी अनुमतीची आवश्यकता नसल्याचे कार्यालयातून आम्हाला सांगण्यात आले. स्थानिक पंचायतीने पुतळा उभारण्यासाठी काँक्रीटचे बांधकाम करायला अनुमती देण्यास विलंब केल्याने आम्ही पुतळा काँक्रीटच्या चौथर्‍यावर बसवण्याऐवजी तो लोखंडी साच्यावर बसवण्याचे ठरवले. यासाठी शहर आणि नगरनियोजन खात्याकडे आम्ही गेलो होतो; मात्र खात्याने १ मीटर उंचीपेक्षा अल्प भूमीत मातीचा भराव घालण्यासाठी शहर आणि नगरनियोजन खात्याच्या अनुमतीची आवश्यकता नसल्याचे आम्हाला सांगितले. यासाठी आम्ही ५ ते ६ ट्रक माती घालून भूमी एका पातळीवर आणली. संबंधित ठिकाणी यंत्रणा आणली, तेव्हा स्थानिकांनी त्याला आक्षेप घेतला होता, अशी माहिती शिवप्रेमी अनंत तांडेल यांनी येथे पत्रकारांना दिली. सां-जुझे-दि-आरियल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासंबंधी आवश्यक सर्व कागदपत्रे दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्द केल्यानंतर शिवप्रेमी अनंत तांडेल पत्रकारांशी बोलत होते.


सां-जुझे-दि-आरियल येथील बैठकीत पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध

सां-जुझे-दि-आरियल येथील ग्रामस्थांनी २२ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याच्या प्रकरणी एका विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या प्रारंभी शेकडो ग्रामस्थांनी मेणबत्ती मोर्चा काढून १९ फेब्रुवारी या दिवशी ग्रामस्थांवर केलेल्या लाठीमाराचा निषेध केला. १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी मातीचे गोळे फेकून आक्रमण केले होते. या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सौम्य स्वरूपात लाठीमार केला होता. (स्वतः मंत्र्यावर मातीचे गोळे फेकणारे आणि कायदा हातात घेतल्यामुळे लाठीमार झाल्यावर मेणबत्ती मोर्चा काढून अत्याचार झाल्याचे नाटक करणारे धर्मांध ख्रिस्ती ! – संपादक)


सां-जुझे-दि-आरियल परिसरात तणावपूर्ण शांतता; शिवरायांच्या पुतळ्याला पोलिसांचे सुरक्षाकवच

मडगाव – सां-जुझे-दि-आरियल (नेसाई) येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देसाई यांच्यासह तब्बल ६० पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी नेमण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण देसाई हे या ठिकाणी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत नजर ठेवून असतात. देहली येथे प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांना पुतळ्याच्या सुरक्षेचे दायित्व देण्यात आले आहे.