Wooden Satellite : जपान जगातील पहिल्या पर्यावरणपूरक लाकडी उपग्रहाचे करणार प्रक्षेपण !

साधारण उपग्रह अ‍ॅल्युमिनियमचे असून त्यामुळे अवकाशातील प्रदूषणाला कारणीभूत !

टोकियो (जपान) – जपानी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला लाकडी उपग्रह बनवला आहे. हा पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्याचा दावा त्याच्याकडून करण्यात आला आहे. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हा उपग्रह लवकरच अमेरिकी रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात येईल.

उपग्रहाचे नाव !

जपानी वैज्ञानिकांनी या लाकडी उपग्रहाला ‘लिग्रोसॅट’ असे नाव दिले आहे.

उपग्रह कुठे बनवण्यात आला ?

जपानमधील क्योटो विद्यापिठातील ‘एअरोस्पेस’ अभियंत्यांनी हा उपग्रह बनवला आहे.

या लाकडी उपग्रहाचे हे आहेत लाभ !

१. उपग्रहामुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणातील प्रदूषण अल्प होईल.

२. ज्या लाकडापासून ते बनवले जाते, ते सहजपणे तुटत नाही.

३. अवकाशात अनेक देशांचे उपग्रह आहेत. ते कालांतराने नाश पावतात. त्यांचे तुकडे अवकाशात तरंगत रहातात. हे तुकडे पृथ्वीवर पडले, तर ते विनाशकारी ठरू शकतात. हा कचरा टाळण्यासाठी आणि अंतराळातील प्रदूषण अल्प करण्यासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.

४. स्थिर रहाणारे आणि न तुटणारे मंगोलियन लाकूडापासून ते बनवण्यात आले आहे.

५. क्योटो विद्यापिठातील एका अभियंत्याचे म्हणणे आहे की, हे लाकूड बायोडिग्रेडेबल (जैवविघटनशील) असून अशा गोष्टी निसर्गात नैसर्गिकरित्या नष्ट होतात.

६. भविष्यात प्रतिवर्षी २ सहस्रांहून अधिक अंतराळयान प्रक्षेपित केले जातील. यामुळे वरच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात अ‍ॅल्युमिनियम जमा होण्याची शक्यता आहे. काही संशोधनातून असे समोर आले आहे की, अ‍ॅल्युमिनियममुळे ओझोनचा थरही कमकुवत होईल. ओझोनचा थर सूर्याच्या धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो.