२४ फेब्रुवारीपासून गावोगावी ‘रस्ता बंद’ आंदोलन !

  • मराठा आरक्षण मिळूनही जरांगे यांचे आंदोलन चालूच ! 

  • ३ मार्चला सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी ‘रस्ता बंद’ची चेतावणी !

मनोज जरांगे-पाटील

अंतरवाली सराटी (जालना) – मराठा समाज २४ फेब्रुवारीपासून परत राज्यभर त्वेषाने आंदोलन करेल, असे मराठा नेते मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणस्थळावरून घोषित केले आहे. शिक्षण आणि नोकर्‍या यांसाठी १० टक्के आरक्षणाचे विधेयक २० फेब्रुवारी या दिवशी विशेष अधिवेशन घेऊन सरकारने संमत केले; परंतु मराठा आंदोलकांना ते मान्य नसून ‘ओबीसी’तूनच आरक्षण मिळण्यासाठी त्यांची आग्रही मागणी आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे ‘सगेसोयरे’ अधिसूचनेच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर ‘सगेसोयरे’ याविषयीच्या आदेशाची कार्यवाही होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, असेही जरांगे यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

सरसकट आरक्षणासाठी त्यांनी सरकारला २ दिवसांची समयमर्यादा दिली आहे. जरांगे म्हणाले की, सरकारने ‘सगेसोयरे’ यांच्याविषयी जी अधिसूचना काढली होती, त्याची कार्यवाही व्हायला हवी होती. अधिवेशनात सरकारने काय केले ? मोटरसायकल दिली, पण पेट्रोल दिले नाही, अशी अवस्था आहे.

२४ ते २९ फेब्रुवारीपर्यंत सगेसोयर्‍यांची कायद्याची कार्यवाही केली नाही, तर मराठा समाजातील वृद्धांना उपोषणाला बसवायचे आवाहन केले आहे. ‘या आंदोलनात वृद्धांचा मृत्यू झाला, तर त्यासाठी सरकार उत्तरदायी रहाणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

जरांगे यांनी दिलेल्या अन्य सूचना

१. जाळपोळ करू नका. निवडणुकीच्या प्रचाराला येणार्‍या गाड्या आपल्या गोठ्यावर नेऊन सोडा; पण कुणाच्याही गाड्यांची तोडफोड करू नका.

२. शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार आणि मंत्री यांना आपल्या दारातही फिरकू देऊ नका. आमदार आणि मंत्री यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी झाल्याचे समजून घ्यावे.

३. १२ वीच्या परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांची अडचण करू नका. आवश्यकता भासली, तर तुम्ही तुमच्या गाड्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षास्थळी पोचवा.

आंदोलनाचे स्वरूप

१. २४ फेब्रुवारीपासून राज्यातील गावोगावी सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत २ सत्रांत ‘रस्ता बंद’ आंदोलन केले जाईल. त्यानंतर ३ मार्च या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत ‘रस्ता बंद’ आंदोलन केले जाईल.

२. प्रत्येक दिवशी ‘रस्ता बंद’ करून सगेसोयर्‍याची कार्यवाही करण्याविषयीचे निवेदन द्या. अधिकारी आल्याशिवाय निवेदन देऊ नका. सामाजिक माध्यमांवर निवेदन देतांनाची छायाचित्रे प्रसिद्ध करा, असे जरांगे यांनी सांगितले आहे.

३. ते म्हणाले की, येथून पुढे आपल्याला आपली गावे सांभाळायची आहेत. कुणीही तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. आंदोलन संपल्यानंतर आपल्या शेतात जाऊन काम करा.

हे ‘रस्ता बंद’ आंदोलन जगातील सर्वांत मोठे आंदोलन असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे.