मागील ३ दिवसांत ४ सहस्र कोटी रुपयांचे २ सहस्र किलो अमली पदार्थ जप्त !

अमली पदार्थ प्रकरणी पुणे पोलिसांच्‍या विविध पथकांच्या राज्यासह देशभर धाडी !

पुणे – पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत कुरकुंभ येथील कारखान्यातून १ सहस्र ४०० कोटी रुपयांचे ७०० किलो अमली पदार्थ जप्‍त केले. त्यानंतर पुणे पोलिसांच्‍या विविध पथकांनी राज्यासह देशभर धाडी टाकल्या. कुरकुंभ येथील आस्थापनात सिद्ध केलेला कच्चा माल पुणे येथून मीरा-भाईंदर, मुंबई, बंगाल आणि नेपाळमार्गे परदेशात पाठवण्यात येत असल्याची माहिती अन्वेषणात मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने देहलीतील आस्थापनावर धाड टाकली. देहलीतून २० फेब्रुवारी या दिवशी १ सहस्र ८०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. आतापर्यंत अवघ्या ३ दिवसांत पुणे पोलिसांनी ४ सहस्र कोटी रुपयांचे २ सहस्र किलो एम्.डी. (मेफेड्रोन) जप्त केले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने काही तस्करांना अटकही केली आहे. पुण्यातील अमली पदार्थ प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम आणि ब्राऊन नावाच्या तस्करांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली. ‘देहली क्राईम ब्रँच’ने टाकलेल्या पहिल्या धाडीत ६०० किलो अमली पदार्थ सापडले होते, तर दुसर्‍या धाडीत १ सहस्र २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

देशातील अमली पदार्थ तस्करीतील बडे तस्कर यामध्ये सामील असून त्यांच्या शोधासाठी अमली पदार्थ प्रतिबंधक संचालनालयाच्या (एन्.सी.बी.) साहाय्याने संपूर्ण देशभरात अन्वेषण चालू करण्यात आले आहे. जप्‍त करण्यात आलेले मेफेड्रोन न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार एक परदेशी नागरिक !

मेफेड्रोनचे उत्‍पादन चालू असलेले आस्थापन नगर जिल्ह्यातील अनिल साबळे व्यक्तीने ‘अर्थ केम प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने चालू केले. या प्रकरणी साबळेला कह्यात घेण्यात आले आहे. याचसह मेफेड्रॉन बनवण्याच्या ‘फॉर्म्युला’ (गणिती सूत्र) देणार्‍या रासायनिक अभियंत्याला डोंबिवली येथून कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग असून विविध परदेशी व्यक्तींचाही यामध्ये सहभाग निष्पन्न होत असल्‍याने त्‍या दृष्टीने अन्वेषण पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणात राज्यासह देशभरात विविध शहरांमध्ये पुणे पोलीस धाडी घालत आहेत. पोलिसांनी २ जणांना कह्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. साबळेचे हे आस्थापन ऑक्टोबर २०२३ पासून चालू होते. या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार एक परदेशी नागरिक आहे. त्याचा युद्धपातळीवर शोध चालू आहे. हे अमली पदार्थ मुंबईमार्गे इतर राज्यांतही पाठवण्यात येत आहेत.

आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग !

या प्रकरणात आणखी अमली पदार्थ मिळून येण्याची शक्यता असून इतर ठिकाणी आरोपींनी कारखाने चालू केले आहेत का ? याचीही चौकशी करण्यात येत आहे. कुरकुंभ येथून देशातील ५ मोठ्या शहरांत मेफेड्रोन पाठवण्यात येत होते. यात कल्याण, भिवंडी, पुणे, भाग्यनगर आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे.

(आधी आतंकवाद्यांच्या रडारवर असलेल्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. ही गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू असतांना पुणे शहरात मिळणारे अमली पदार्थ ही धोक्याची घंटा आहे. बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अमली पदार्थ निर्मितीची पाळेमुळे पोलीस खणून काढणार का ? – संपादक)

अमली पदार्थ निर्मितीचे केंद्र ठरत आहे कुरकुंभ एम्.आय.डी.सी. !

२० फेब्रुवारीला साबळेच्या आस्थापनातील हा प्रकार उघडक झाला. १३ घंटे पुणे पोलिसांची ही कारवाई केली. साबळेचे कुणाकुणाशी संबंध आहेत ? त्यातून साबळेने गुन्हेगारी मार्गाने किती संपत्ती जमा केली ? या उद्योगात साबळेचे इतर कोण साथीदार आहेत ? साबळेवर कुणाचा वरदहस्त आहे ? ललित पाटीलवरील कारवाईनंतरही साबळेने मेफेड्रॉनची निर्मिती कशी चालू ठेवली ? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. कुरकुंभ एम्.आय.डी.सी.मधील आस्थापनांमध्ये अशा प्रकारे अमली पदार्थांची निर्मिती होत असल्याची ही तिसरी घटना आहे. साबळेच्या ‘अर्थकम’ आस्थापनावरील कारवाईपूर्वी याच ठिकाणी या भागात असलेल्या ‘समर्थ लॅबोरेटरीज’ आणि ‘सुजलाम केमिकल्स’ नावाच्या आस्थापनावरही पोलिसांनी कारवाई केली होती.

संपादकीय भूमिका

सहस्रो रुपयांचे अमली पदार्थ सापडणे म्हणजे तरुण पिढी मनाने प्रचंड प्रमाणात कमकुवत होत असल्याचे द्योतक !