पंढरपूर – २० फेब्रुवारीला झालेल्या माघ यात्रेसाठी पंढरपूर वारकर्यांच्या उपस्थितीने भरून गेले असून यात्रेसाठी अडीच लाखांहून अधिक वारकरी उपस्थित आहेत. या वारीसाठी गेल्या २ दिवसांपासून भाविकांनी गर्दी करण्यास प्रारंभ केला होता. टाळ-मृदंग, विठ्ठलाचा गजर, भगव्या पताका यांमुळे पंढरपूर गजबजून गेले आहे. वारकर्यांना लवकर दर्शन होण्यासाठी ‘व्ही.आय.पी.’ आणि ‘ऑनलाईन’ दर्शन बंद करण्यात आले आहे, तसेच दर्शन रांगेत घुसखोरी टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.
पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. वारीसाठी सोलापूर, मराठवाडा, कोकणातून मोठ्या संख्येने दिंड्या-पालख्यांसह वारकरी आले आहेत. मंदिर समितीने वारकर्यांना साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप केले. उन्हाच्या वाढलेल्या झळा आणि चंद्रभागेत पाणी अल्प असल्याने नदीचे पात्र कोरडे पडल्याने वारकर्यांना यंदा पुरेशा प्रमाणात स्नान करता आले नाही, त्यामुळे वारकर्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.