Taliban Threatens Pakistan : पाकिस्तानची शकले पाडून दुसरा बांगलादेश निर्माण करण्याची तालिबानची धमकी !

संतप्त पाकिस्तानी यासाठी भारताला ठरवत आहेत दोषी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान आणि तालिबान शासित अफगाणिस्तान यांच्यामध्ये सातत्याने तणावाचे वातावरण आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला ‘वर्ष १९७१ प्रमाणे पाकिस्तानचे तुकडे करणार’, अशी धमकी दिली आहे. यामुळे पाकिस्तानी संतापले आहेत. ‘भारताने अफगाणिस्तानमध्ये पुष्कळ विकास केला आहे. त्यामुळे तेथील तालिबान सरकार भारताकडे झुकले आहे’, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानचा पूर्व भाग वेगळा होऊन बांगलादेश बनला होता.

१. सामाजिक माध्यमांमध्ये एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात तालिबान प्रशासनाचा उप परराष्ट्रमंत्री शेर महंमद अब्बास स्तानेकझाई, ‘वर्ष १९७१ प्रमाणे पाकिस्तानचे विभाजन करणार’, अशी धमकी देत आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने लाखो अफगाणी निर्वासितांना देशातून हाकलून देण्यास आरंभ केला असतांना तालिबानने ही धमकी दिली होती.

२. पाकिस्तानी यू ट्यूबर सना अमजद यांनी याविषयी लोकांशी चर्चा केली. यात एका पाकिस्तानी व्यक्तीने म्हटले, ‘युद्धात अमेरिकेला पाठिंबा देऊन पाकिस्तानने चूक केली आहे. त्यामुळे तालिबान आमच्यावर नाराज आहे.’

३. आणखी एका तरुणीने म्हटले, ‘आपण पंथ आणि प्रांत यांमध्ये विभागले गेलो आहोत. एकेकाळी आम्ही अफगाणी लोकांना आश्रय दिला आणि आता त्यांना हाकलून देत आहोत. पाकिस्तान परराष्ट्र धोरणांच्या अंतर्गत घेत असलेले निर्णय समजण्याच्या पलीकडे आहेत. पाकिस्तानने सर्वांशी संबंध बिघडवले आहेत. अफगाणिस्तान, इराण आणि भारत यांच्याशी संबंध बिघडले आहेत. भारतासमवेतचे संबंध चांगले असते, तर आमची परिस्थिती वाईट झाली नसती.’

४. ‘भारताचा पाठिंबा असल्यामुळे तालिबान असे म्हणत आहे का ?’, असे एका तरुणीला विचारले असता तिने, ‘आपण इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये’, असे सांगितले.

५. अन्य एका व्यक्तीने सांगितले की, तालिबानशी लढाई झाली, तर त्याची अनेक कारणे असू शकतील; पण पाकिस्तानला हे कधीच नको आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमधील अराजक पहाता त्या देशाचे आणखी ४ हून अधिक तुकडे होण्याची शक्यता आहे. येत्या काळात जगाच्या नकाशावर पाकिस्तान नावाचा देश शिल्लक रहाणार नाही, हे सत्य असून याची जाणीव भारतातील पाकप्रेमींनी ठेवावी !