कर्नाटक राज्यातील शाळांमधील स्वागताच्या फलकावरील ‘हे ज्ञानमंदिर आहे, हात जोडून आत या’ हे वाक्य हटवले !

  • या वाक्याच्या ठिकाणी ‘धैर्याने प्रश्‍न विचारा’, असे नवीन वाक्य लिहिले !

  • हिंदु जनजागृती समितीने केला विरोध !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील विजयपूर, शिवमोग्गा यांसह अनेक जिल्ह्यांतील शाळांमध्ये फलकावरील ‘हे ज्ञानमंदिर आहे, हात जोडून आत या’ हे वाक्य पालटून ‘धैर्याने प्रश्‍न विचारा’ असे वाक्य घालण्यात आले आहे. याला राज्यात विरोध होऊ लागला आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. सरकार ‘हात जोडणे’, याला धर्माशी जोडून मुलांमध्ये असलेले आपले आचार, विचार, संस्कृती यांचा नाश करण्याचे षड्यंत्र रचत आहे. कोरोना महामारीच्या काळात ब्रिटनचे तत्कालीन राजकुमार चार्ल्स यांच्यासह जगातील अनेक राष्ट्रांचे प्रमुख हात जोडून ‘नमस्कार’ करून स्वागत करत होते. ही आपल्या देशाची श्रेष्ठ संस्कृती आहे. ही नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारची वागणूक अत्यंत निंदनीय आहे.

२. सर्वोच्च न्यायालयाच्या फलकावर ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले आहे. ‘त्यालाही धर्माचा रंग द्याल का ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो. ‘आपल्या देशाची मूळ संस्कृतीच काढून टाकल्यावर पुढे त्या मुलांनी सुसंस्कृत होऊन देश कसा चालवायचा ?’ असा संताप निर्माण झाला आहे.

३. सरकारला हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्याची पार्श्‍वभूमी आहे. सरकारच्या या वागणुकीला ही पार्श्‍वभूमी कारणीभूत आहे. पालक आणि त्यांची मुले यांनी सरकारचे हे निंदनीय कृत्य जाणून तत्परतेने फलकामध्ये पुन्हा पालट करण्याचा आग्रह धरणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका 

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे, त्याचेच हे उदाहरण होय !
काँग्रेसला मत देऊन सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंनी सरकारच्या अशा कृत्यांचा संघटित होऊन विरोध केला पाहिजे !