नीलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्षाचे प्रकरण
चिपळूण – माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर १६ फेब्रुवारीला दगडफेक करण्यात आली. त्यानंतर राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना सामोरे गेले होते. या दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्या अनुमाने ३०० कार्यकर्त्यांच्या विरोधात रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
भाजपचे नेते नीलेश राणे शृंगारतळी येथे सभेला जात असतांना येथील भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांत दगडफेकीचा प्रकार घडला होता. या दगडफेकीत काही कार्यकर्ते घायाळही झाले होते. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
या घटनेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चिपळूण घटनेसंदर्भात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
या प्रकरणी १७ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी सगळा घटनाक्रम पहावा. गुन्हे नोंद करण्यापूर्वी संपूर्ण छायाचित्रण (फुटेज) तपासावे. आम्ही पोलिसांना घटनेपूर्वीच असे काहीतरी घडणार, याची कल्पना दिली होती. पत्रव्यवहारही केला होता. माझ्या कार्यालयासमोर त्यांनी वाट्टेल ते पोस्टर्स आणि बॅनर्स लावले. येथील परंपरेप्रमाणे त्यांच्या एकाही पोस्टर किंवा झेंड्याला आम्ही हात लावलेला नाही. पोलिसांनी कर्तव्य बजावले असते, तर हा प्रकार टाळता आला असता.
या प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनीही पत्रकार परिषद घेऊन अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य करणार्या माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सचिन कदम म्हणाले की, राणेंकडून जिल्ह्यात शांतता भंग करण्याचे काम चालू असून जाणीवपूर्वक हे घडवले जात आहे. कायदा हातात घेणे चुकीचे आहे, अशा गोष्टींना भाजप खतपाणी घालणार असेल, तर हे दुर्दैव आहे.
या प्रकरणी येथील मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ओवेस पेचकर यांनी पोलिसांत तक्रार करतांना म्हटले आहे की, १६ फेब्रुवारी या दिवशी दोन्ही नेत्यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवला होता. या जमावाने महामार्गाची कोंडी करत एकमेकांवर दगडफेक करून गाड्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर गुन्हा नोंद करावा.