VAIBHAV Fellowship : भारताच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी परदेशातील भारतीय वंशाचे ७५ शास्त्रज्ञ ३ वर्षांसाठी परतणार !

(चित्रावर क्लिक करा)

नवी देहली : भारतीय वंशाचे अनुमाने ७५ शास्त्रज्ञ पुढील ३ वर्षांत भारतात परत येऊ शकतात आणि सरकारच्या नवीन शिष्यवृत्ती (फेलोशिप) योजनेअंतर्गत विविध विज्ञान अन् तंत्रज्ञान प्रकल्पांवर काम करू शकतात. या योजनेसाठी अंदाजे ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या तुकडीत २२ शास्त्रज्ञांची याआधीच निवड झाली असून या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचा या संस्थांमध्ये समावेश होईल, अशी अपेक्षा आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने प्रारंभ केलेल्या वैभव योजनेमध्ये परदेशातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये किमान ४ वर्षे सक्रीय संशोधनात गुंतलेल्या भारतीय वंशाच्या सर्व शास्त्रज्ञांना आयआयटीसह भारतातील कोणतीही प्रतिष्ठित संस्था आणि विश्‍वविद्यालय येथे सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

त्यांना प्रतिवर्षी ४ लाख रुपये मानधन दिले जाईल. ते भारतात येऊन अल्प कालावधीसाठी काम करण्यासाठी रजा घेऊ शकत असले, तरी त्यांना त्यांच्या मूळ संस्थेकडून संमतीपत्र घ्यावे लागेल.