मुंबई – ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळत आहे, तेच मिळणार आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर बोलतांना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ‘सरकारने आता कुणबीकरण थांबवावे’, अशी मागणी केली आहे, तसेच ‘मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत; मात्र त्यांना आयोग आणि मसुदा नेमका किती कळतो ?’, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे; मात्र ‘ओबीसी’तून आरक्षण देण्याला विरोध आहे; कारण अलीकडे अनेक मराठा समाजाच्या लोकांना खोट्या नोंदी घेऊन कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये एका घरात ८६ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यामुळे सरकारने कुणबीकरण थांबवावे. कुणबी समाजाला दिलेले ओबीसी दाखले पडताळायला हवेत.