‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. १६.२.२०२४ या दिवशी ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व पाहिले. आज उर्वरित भाग पाहू.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/765095.html

७ घोडे असलेल्या रथात बसलेला सूर्यदेव

५. रथसप्तमीच्या तिथीला श्री सूर्यनारायणाच्या रथाच्या प्रतिमेचे पूजन केल्यामुळे पुढील लाभ होणे

‘माघ शुक्ल सप्तमी, म्हणजे रथसप्तमी या तिथीला सूर्यरथाची पुढीलप्रमाणे पूजा करतात. रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवर्‍या पेटवून त्यांवर एका बोळक्यात (मातीचे लहान भांडे) दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे दूध अग्नीला समर्पण होईपर्यंत तापवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण’)

अशा प्रकारे सूर्यरथाचे पूजन केल्यावर पुढील लाभ होतात.

अ. रथाचा संपूर्ण रंग ‘हिरण्यमय’, म्हणजे सोनेरी आहे. त्यामुळे या रथाला ‘हिरण्यमय रथ’, असेही संबोधतात. या हिरण्यमय सूर्यरथाच्या दर्शनाने आनंदाची अनुभूती येते.

आ. रथाचा मार्ग सुनिश्चित असल्याने रथ कधीही त्याच्या सुमार्गावरून भरकटत नाही. अशा दिव्य सूर्यरथाच्या प्रतिमेचे पूजन केल्यामुळे मनुष्यही धर्माच्या मार्गावरून भरकटत नाही.

इ. रथाच्या दर्शनाने समस्त पाप, ताप, संताप, दुःख आणि दैन्य नष्ट होऊन पुण्यफळाची प्राप्ती होते.

ई. रथातून प्रक्षेपित होणार्‍या सूर्य तेजोलहरींमुळे जिवावरील मायेचे आवरण दूर होऊन श्री सूर्यनारायणाची कृपा होते. त्यामुळे त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते.

उ. रथातून पृथ्वी आणि आप या तत्त्वांसह तेजतत्त्वाचे प्रक्षेपण वाढल्यामुळे जिवांना दैवी कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते.

ऊ. सूर्य मानवाच्या शारीरिक व्याधी दूर करतो आणि त्याला दीर्घायुष्य देतो.

६. सूर्याच्या रथाला मिळालेल्या विविध नावांमागील आध्यात्मिक तत्त्व, सूर्यदेवाचे संबंधित रूप आणि विशिष्ट रथाचे कार्य ! 

७. सूर्यनारायणाच्या चरणी अर्पण करते ही भावसुमनांजली !

सुश्री (कु.) मधुरा भोसले

सूर्यदेवा रथसप्तमीच्या या शुभदिनी ।
निरांजनाच्या ज्योतीने तुला ओवाळूनी ।
कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही मनापासूनी ।
आरोग्य अन् सौख्य लाभो आमुच्या जीवनी ।। १ ।।

भानु, मित्र, भास्कर आणि रवि ।
तुझी रूपे पहाण्यासाठी तुझीच कृपा हवी ।
तू दिलेल्या दृष्टीने सारी सृष्टी पहावी ।
अन् तुझ्या पावन चरणी भावसुमनांजली वहावी ।। २ ।।

धर्मसंस्थापना करण्याची आली वेळ ।
म्हणुनी पृथ्वीवर अवतरला श्रीमन्नारायण ।
हिंदु राष्ट्र स्थापन करण्या ।
बल दे आम्हा हे सूर्यनारायणा ।। ३ ।।

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(११.२.२०२४)

(समाप्त)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.