‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ आहे. त्यानिमित्ताने…

‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

सूर्यदेवता

१. ग्रह आणि तारे यांची निर्मिती ही उत्पत्तीशी, त्यांचे भ्रमण स्थितीशी आणि ते कृष्णविवरात विलीन होणे, हे लयाशी संबंधित कार्य असणे

जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हा ब्रह्मांडामध्ये काही सूर्यरूपी तारे आणि ग्रह निर्माण झाले. तारे स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्यांना बाह्य तेजावर अवलंबून रहाण्याची आवश्यकता नसते; परंतु ग्रहांकडे प्रकाश नसल्यामुळे त्यांना तार्‍यांवर अवलंबून रहावे लागत होते. ग्रहांची ही समस्या सोडवून त्यांना तेज प्रदान करण्यासाठी काही ग्रहांसाठी एक तारा असलेले सौरमंडल निर्माण करण्यात आले. त्यामुळे ग्रह विशिष्ट तार्‍यांभोवती फिरू लागले. त्याचप्रमाणे तार्‍यांना ब्रह्मांडातील केंद्रबिंदू असलेल्या कृष्णविवराच्या भोवती भ्रमण करून शेवटी कृष्णविवरात सौरमंडल विलीन करण्याची प्रक्रिया आरंभ झाली. अशा प्रकारे ग्रह आणि तारे यांची निर्मिती ही उत्पत्तीशी, त्यांचे भ्रमण स्थितीशी आणि ते कृष्णविवरात विलीन होणे, हे लयाशी संबंधित असते.

२. सूर्याला आकाशगंगेतील विशिष्ट मार्गावरून मार्गक्रमण करून त्याचा फेरा पूर्ण करण्यासाठी श्रीमन्नारायणाने सूर्यदेवाला सात घोडे जुंपलेला दिव्य रथ प्रदान करणे

७ घोडे असलेल्या रथात बसलेला सूर्यदेव

संपूर्ण ब्रह्मांडाला तेज प्रदान करण्यासाठी १२ सूर्य किंवा १२ आदित्य कार्यरत असतात. अशा प्रकारे सूर्याला आकाशगंगेतील विशिष्ट मार्गावरून मार्गक्रमण करून त्याचा फेरा पूर्ण करायचा असतो. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्याला रथाची आवश्यकता असते. त्यामुळे त्याची आवश्यकता लक्षात घेऊन कृतयुगाच्या आरंभी (सत्ययुगाच्या आधीचे युग) माघ शुक्ल सप्तमीच्या तिथीला श्रीमन्नारायणाने सूर्यदेवाला सात घोडे जुंपलेला एक दिव्य रथ प्रदान केला. संख्याशास्त्रानुसार ‘७’ हा अंक सूर्याशी संबंधित आहे. त्यामुळे सूर्यदेवाला माघ शुक्ल सप्तमीला मिळालेल्या रथाचे पूजन केल्यामुळे ही तिथी ‘रथसप्तमी’ या नावाने ओळखली जाते. ज्याप्रमाणे श्रीमन्नारायण समस्त सृष्टीचे पालन पोषण करतो, त्याप्रमाणे सूर्यदेवही समस्त सृष्टीला तेज आणि ऊर्जा प्रदान करून सृष्टीच्या पालन-पोषणाच्या कार्यात सहभागी होतो. त्यामुळे जेव्हा सूर्यदेवाला दिव्य रथ प्राप्त झाला, तेव्हा त्याच्या समष्टी कार्याचा विस्तार होऊन त्याला ‘श्री सूर्यनारायण’ हे दैवी नाव प्राप्त झाले.

३. श्री सूर्यनारायणाचे मूर्तीविज्ञानामागील अध्यात्मशास्त्र

सुश्री (कु.) मधुरा भोसले

जेव्हा श्री सूर्यनारायणाचे तारक रूप कार्यरत असते, तेव्हा तो ‘द्विभुज’ म्हणजे दोन भुजा (हात) असणारा असतो. जेव्हा त्याचे तारक-मारक अशी दोन्ही रूपे एकाच वेळी कार्यरत असतात, तेव्हा तो ‘चतुर्भुज’ स्वरूपात असतो. त्याच्या उजव्या बाजूच्या वरच्या हातातील सुदर्शनचक्राने तो आसुरी शक्ती आणि रज-तमात्मक लहरी यांचा विनाश करतो. त्याच्या डाव्या बाजूच्या वरील हातातील शंखाने तो दैवी नादाचा निनाद करून धर्मरथाच्या मार्गातील अडथळे दूर करतो. त्याचप्रमाणे तो त्याच्या डाव्या बाजूच्या खालील हातातील कमळाने सृजनाचे कार्य करून उजव्या बाजूच्या खालील आशीर्वाद मुद्रेतील हाताने जिवांना आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण करतो.

४. सूर्याच्या रथाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे आध्यात्मिक विवरण

टीप – खगोलीय कालखंड : खगोलशास्त्रामध्ये, ‘अयन’ हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या संदर्भात ६ महिन्यांचा कालावधी दर्शवतो. वर्षामध्ये दोन अयन असतात.

उत्तरायण : जेव्हा सूर्य पृथ्वीच्या उत्तरेकडील गोलार्धात असतो, तेव्हा तो ६ महिन्यांचा कालावधी असतो. मराठीमध्ये याला ‘उत्तरायण’ किंवा ‘उषीरकाल’ असेही म्हणतात.

दक्षिणायन : जेव्हा सूर्य पृथ्वीच्या दक्षिणेकडील गोलार्धात असतो, तेव्हा तो ६ महिन्यांचा कालावधी असतो. मराठीमध्ये याला ‘दक्षिणायन’ किंवा ‘दाक्षिणकाल’ असेही म्हणतात.

संदर्भ : मराठी विश्वकोश, मुंबई विद्यापीठ, खगोलशास्त्र विभाग आणि संस्कृत-इंग्रजी शब्दकोश.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२४)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/765466.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.