पंचनामा करतांना अनेक गोष्टी पंचांनी नमूद केल्या नाहीत ! – अधिवक्ता अनिल रुईकर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कॉ. गोविंद पानसरे

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित अमोल काळे यांच्या संदर्भातील काही घटनांची साक्ष पंच बाबूराव जाधव यांनी १५ फेब्रुवारीला न्यायालयात नोंदवली. या संदर्भात संशयितांनी जे निवेदन केले, असे सांगण्यात आले त्याचा वेगळा पंचनामा करण्यात आला नाही. पंच जेव्हा पोलिसांसमवेत एका इमारतीत गेले, तेव्हा तेथे ‘सी.सी.टी.व्ही.’ आहेत, याची निश्चिती केली नाही, तसेच आजूबाजूच्या सदनिकाधारकांचे जबाब घेतले नाहीत. यांसह अनेक गोष्टी पंचांनी पंचनाम्यात नमूद नसल्याचे संशयितांचे अधिवक्ता अनिल रुईकर यांनी उलट पडताळणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे उपस्थित होते. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता डी.एम्. लटके यांनीही पंचांची उलट पडताळणी घेतली. या प्रसंगी अधिवक्ता आदित्य मुद्गल, अधिवक्त्या प्रीती पाटील उपस्थित होत्या.

या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘सरकार पक्षाचे म्हणणे होते की, वर्ष २०१८ मधील काही संशयित आरोपी कोल्हापूर येथे राहिले होते आणि त्या संदर्भातील काही घटना पंचांनी न्यायालयात सांगितल्या. प्रत्यक्षात हत्येची घटना ही फेब्रुवारी २०१५ ची आहे. त्यामुळे या पंचांच्या साक्षीतून हत्येचा उलगडा होईल, खरा खुनी समोर येईल, असे काहीच नव्हते. आम्ही प्रारंभीपासून हेच विचारत आहोत की, कॉ. पानसरे यांची हत्या नेमकी कुणी केली ? याविषयी सरकार पक्षाचाच गोंधळ आहे. हा खटला इतकी वर्षे चालू आहे; मात्र कॉ. पानसरे यांना संशयित समीर गायकवाड यांनी गोळ्या मारल्या कि सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या मारल्या ? कि सचिन अंधुरे अन् वासुदेव सूर्यवंशी यांनी गोळ्या मारल्या हेच अन्वेषणातून स्पष्ट होत नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.’’