पुणे – वाघोली पोलीस ठाण्यासमोर रोहिदास जाधव या तरुणाने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक सचिन जाधव यांसह सोसायटीतील आबनावे कुटुंबातील ३ जण, डॉ. पाचारणे यांच्यासह इतर १५ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
बांधकाम व्यावसायिक, तसेच सोसायटीतील इतर काही जणांनी तरुणासह त्याच्या भावाला सोसायटीमधील वाहनतळ आणि गच्ची यांचा वापर करण्यास मनाई केली होती, तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाणही केली होती. या संदर्भात रोहिदास जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने बांधकाम व्यवसायिकाच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता; मात्र बांधकाम व्यावसायिक आिण आबनावे यांना कह्यात घ्यावे, अशी तरुणाची मागणी होती. रोहिदासने वाघोली पोलीस ठाण्यासमोर स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पेटवून घेतल्याने रोहिदासची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण येरवडा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील करत आहेत.