आमदार भीमराव तापकीर यांनी वनविभागाला फैलावर घेतले !
खडकवासला (जिल्हा पुणे) – सिंहगडावर प्रतिदिन जमा झालेला सर्व प्रकारचा कचरा, विक्रेते गडाच्या तटबंदी वरून टाकून देत आहेत. अनेक शिवप्रेमी संस्था, संघटना, व्यायामासाठी येणार्यांनी भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांना याविषयी तक्रारी केल्या होत्या. तटबंदी खालील कचरा पाहून आमदार भीमराव तापकीर यांनी नाराजी व्यक्त करूनही वनविभाग बघ्याची भूमिका घेत आहे. तापकीर यांनी याविषयी वनविभागाला चांगलेच फैलावर घेतले. कचर्याविषयी विक्रेते ऐकत नसतील, तर सर्व ‘स्टॉल्स’ बंद करा. अशा सूचना त्यांनी वनविभागाला केल्या आहेत. (ऐतिहासिक वास्तूंविषयी असंवेदनशील असणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) सिंहगडाच्या विकास आराखड्याविषयी करायच्या कामाच्या संदर्भात अधिकारी आणि सल्लागार यांच्या समवेत त्यांनी पहाणी केली.
भीमराव तापकीर पुढे म्हणाले की,
१. सिंहगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य आणि पदस्पर्श यांनी पावन झालेली नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलीदानाची भूमी आहे. येथे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. गडाचे संवर्धन, पर्यावरण जपण्याकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
२. दूरदर्शन, आकाशवाणी, भारत संचार निगम लिमिटेड, पोलीस वायरलेस विभाग, राज्य परिवहन महामंडळ यांसह अनेक प्रकारचे ‘टॉवर’ गडावर आहेत. बंद अवस्थेत असलेले टॉवर काढून टाकावेत.
संपादकीय भूमिकागडदुर्गांच्या स्वच्छतेविषयी वनविभागाने उदासीन असणे गंभीर आणि संतापजनक ! |