परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना आणि सेवा यांतील आनंद अनुभवणार्‍या रामनाथी (फोंडा, गोवा) येथील सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे) यांनी उलगडलेला स्वतःचा साधनाप्रवास !

१५.२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सौ. नंदिनी उल्हास पोकळे यांच्या साधनाप्रवासाच्या अतंर्गत त्यांचे शिक्षण, नोकरी, सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ करणे, साधना करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी केलेल्या सेवा’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/764788.html

सौ. नंदिनी पोकळे

८. मुलाला लहान वयातच सेवेची गोडी लागणे

‘माझा मुलगा रोशन ५ वर्षांचा असतांना माझ्या समवेत प्रवचन आणि सत्संग यांना येत असे. त्या वेळी तो प्रवचनाला येणार्‍या जिज्ञासूंना देवतांच्या लघुग्रंथांचे वितरण करायचा. तो साधकांशी प्रेमाने वागायचा.

९. कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत अध्यात्मप्रसाराची सेवा करणे

पूर्वी कर्नाटक राज्यामध्ये सेवा करणारे साधक अल्प होते. मला मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषा येतात. त्यामुळे मला ‘अध्यात्मप्रसार करणे, प्रवचने आणि अभ्यासवर्ग घेणे’, अशा सेवा मिळत गेल्या. वर्ष १९९८ मध्ये आम्हाला (मला आणि माझे यजमान श्री. उल्हास पोकळे यांना) बाहेरगावी, म्हणजे मंगळुरू, बेंगळुरू, मैसुरू, हुबळ्ळी आणि मुंबई येथे जाऊन अध्यात्मप्रसार करण्याची संधी लाभली. तेव्हा आमचा मुलगा रोशन ५ वर्षांचा होता. त्यालाही आम्ही सेवेसाठी समवेत नेत होतो.

आम्ही कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात अंकोला, कुमटा, होन्नावर, शिरसी, जोयडा आणि कुंबारवाडा येथे सुटीच्या दिवशी, म्हणजे शनिवार अन् रविवार या दिवशी प्रसार करत होतो अन् सत्संग घेत होतो. त्या वेळी मी प.पू. गुरुदेवांनी संकलित केलेल्या ग्रंथांचे वाचन केले. मला या ग्रंथांचे वितरण करण्याचीही संधी मिळाली.

आमच्याकडून दोन ते अडीच वर्षे प्रसाराची सेवा झाली. सनातन संस्थेत सेवा करायला भाग्य लागते. त्यानंतर गुरुदेवांनी मला माझ्या शाळेतील नोकरीकडे लक्ष देण्यास सांगितले. आम्हाला अनेक वेळा संस्थेतील ज्येष्ठ साधकांचा सत्संग लाभला. नोकरी आणि घर सांभाळून आम्ही अनेक सेवा करत होतो.

१०. मानसिक त्रास चालू झाल्यावरही साधना चालू ठेवणे

वर्ष २००० नंतर काही काळ मला मानसिक त्रास झाला. त्यामुळे मी सेवा करू शकत नव्हते. आधुनिक वैद्यांचे उपचार, तसेच नोकरी, घर आणि मुलांचे शिक्षण यांमुळे माझ्या सेवेत खंड पडला. माझे आरोग्य बिघडले. माझ्या शरिरावर औषधे आणि गोळ्या यांचा विपरीत परिणाम झाला, तरीही मी मंदिरात जायचे अन् घरात देवपूजा अन् ग्रंथांचे वाचन करायचे. मी मंदिरात आलेल्यांना कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करण्यास सांगायचे अन् साधनेचे महत्त्व पटवून द्यायचे.

११. मुलाने सेवेत पुष्कळ साहाय्य करणे

वर्ष २००७ मध्ये कर्नाटकातील शिरसी या गावी हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. त्या वेळी मी मुलाला घरी ठेवून २० दिवस शिरसी येथे राहिले होते. तेव्हा मुलाने मला साहाय्य केले आणि मला माझ्या कठीण परिस्थितीत सांभाळून घेतले.

श्री. उल्हास पोकळे

१२. सेवा करतांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०१२ मध्ये आम्ही समाजात अर्पण आणि विज्ञापने आणण्यास जात होतो. तेव्हा आम्ही अर्पणदात्यांना कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व पटवून द्यायचो. प्रसाराची सेवा करतांना आम्हाला अनेक अनुभूती यायच्या.

अ. धर्मरथावर सेवा करतांना आम्हाला देवतांचे अस्तित्व जाणवायचे.

आ. प्रत्येक वेळी ‘ईश्वर आमच्या समवेत आहे आणि तोच आमच्याकडून कार्य करून घेत आहे’, असे आम्हाला वाटायचे.

इ. सेवा करतांना आम्हाला थकवा आणि आळस जाणवत नव्हता.

१३. कारवारहून गोवा येथे स्थलांतर आणि रामनाथी आश्रमात चालू झालेली साधना !

१३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगानंतर त्यांच्या कृपेने कारवारहून गोव्याला रहायला येणे : एकदा आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ झाला. प.पू. गुरुदेवांचे अत्यंत व्यापक आणि आनंद देणारे, असे दर्शन झाल्याने माझे मन तृप्त अन् धन्य झाले. त्यांच्या कृपेने आम्ही पुढील ७ मासांत कारवारहून गोव्याला रामनाथी आश्रमाजवळ भाड्याच्या घरात रहायला आलो.

१३ आ. रामनाथी आश्रमात येऊन नामजपादी उपाय करणे : ऑगस्ट २०२३ मध्ये मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजपादी उपाय नियमित करू लागले. हे माझे मोठे भाग्य आहे. येथे मला देवाच्या सान्निध्यात रहाता येते. आश्रम म्हणजे माझ्यासाठी ‘वैकुंठ’ आहे.

१३ इ. आश्रमात मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे साधनेविषयी मार्गदर्शन लाभले.

१३ ई. १५.९.२०२३ पासून उत्तरदायी साधकांनी मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या सत्संगाला उपस्थित रहाण्यास सांगितले.’

– सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (२५.९.२०२३) (क्रमशः)

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/765576.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक