प.पू. स्वामीजी यांच्यावर मान्यवरांनी अर्पिली स्तुतीसुमने आणि केला गुणगौरव !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा सन्मान

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा हार घालून सन्मान करताना १. श्री रणजीत सावरकर आणि २. श्री रमेश शिंदे सोबत श्री सुरेश चव्हाणके आणि सौ. नीलम गोऱ्हे.

असा झाला कार्यक्रम !

१. राष्ट्रगीत आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत यांनी कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘सकल जगामध्ये छान, आमचे प्रियकर हिंदुस्थान’ हे गीत सादर केले.

३. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांची भाषणे झाली.

४. ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

५. प.पू. स्वामीजींना दिलेल्या मानचित्राचे वाचन सावरकर स्मारकाच्या मंजिरी मराठे यांनी केले.

व्यासपिठावर उपस्थित मान्यवर !

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, भाजपचे आमदार आशिष शेलार, आमदार श्री. अतुल भातखळकर, ‘सुदर्शन’ वृत्तसमूहाचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांचा सत्कार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची ६० वर्षे नुकतीच पूर्ण केली. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. स्मारकाच्या वतीने श्री. रणजित सावरकर आणि समितीच्या वतीने रमेश शिंदे यांनी हा सत्कार केला. शाल आणि पुष्पगुच्छ घालून हा सन्मान करण्यात आला. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने एकनाथ शिंदे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मूर्ती दिली, तर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकनाथ शिंदे यांना प्रभु श्रीरामाची प्रतिमा आणि समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले राष्ट्र-धर्म विषयक ग्रंथ भेट देण्यात आले.

‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचे प्रकाशन !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाविषयी मनोगत !

गांधीहत्येनंतर मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला. एक राजकीय प्रवाहाला संपवून दुसर्‍या परिवाराला पुढे आणले गेले. तत्कालीन परिस्थितीत योग्य अन्वेषण झाले नाही. यामागील विविध अंगांचे लिखाण पुस्तकात करण्यात आले आहे. खोलवर संशोधन करून हे लिखाण करण्यात आले असल्याचे ‘मेक शुअर गांदी इज डेड’ या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करतांना लेखक रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.

 

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे सुवासिनींनी औक्षण केले तो क्षण !

या वेळी व्यासपिठावर ५ सुवासिनींनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे औक्षण केले. हा क्षण अद्वितीय ठरला !

नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

प.पू. स्वामीजींचे कार्य मोठे आहेच. कोरोना महामारीच्या कठीण काळात भगवद्गीता आणि अध्यात्म या विषयावर शेकडो प्रवचने ऑनलाईन घेऊन स्वामीजींनी १०० हून अधिक देशांतील लोकांना धीर दिला, तसेच आशीर्वाद दिला. हे त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. सर्व धार्मिक विचार समजून घेऊन त्यातून अनुभूती देण्याचे कार्य स्वामीजी करत आहेत. धर्मांतराची भीषण सद्यस्थिती पहाता ते  रोखण्याविषयी सर्वेक्षण व्हायला हवे.  – नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

अतुल भातखळकर, आमदार आणि प्रवक्ते, भाजप

या कार्यक्रमात बोलायची संधी मिळत आहे, यासाठी मी स्वतःला गौरवांकित समजतो. प.पू. स्वामीजींसमोर मी बोलणे म्हणजे ज्योतीने तेजाची आरती करण्यासारखे आहे. प.पू. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीचा प्रसार केला. हिंदुत्वाच्या विचारांचा प्रचार केला. त्यांच्यासारख्या व्यक्तींनी आयुष्याचा होम करून कार्य केले. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत झालेल्या श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे श्रेय जाते.  – अतुल भातखळकर, आमदार आणि प्रवक्ते, भाजप विधान परिषद

आमदार आशिष शेलार, भाजप

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. त्यांची शिकवण केवळ प्रवचनातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून ते देत आहेत. त्यांच्या वाणीत सरस्वतीमातेचा वास आहे. कलियुगात स्वामीजींचे कार्य स्वामी विवेकानंदाप्रमाणे मला वाटते. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका सदाचारातून होते आणि प.पू. स्वामीजी या विचारांचे पाईक आहेत. – आमदार आशिष शेलार, भाजप

रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर बाबाराव सावरकर यांनी स्वतःची मोक्षाची इच्छा बाजूला ठेवून राष्ट्रासाठी कार्य केले. तुम्ही संन्यास घेतला, तरी तुम्ही राष्ट्राकरता सर्वांत मोठे कृत्य केले. श्रीराममंदिर आमच्या राष्ट्राचा प्राण होता. सावरकर म्हणाले होते, ‘‘जेव्हा आम्ही रामाला विसरू, तेव्हा आमचा प्राण जाईल.’’ मराठ्यांनी दोन तृतीयांश भारतावर राज्य केले होते. धर्माला शस्त्राचा आधार हवा आणि शस्त्राला धर्माचा अंकुश हवा. ‘जो हिंदु हित की बात करेगा वही देश पे राज करेगा’ हे विसरता कामा नये.

जनतेने अफाट पैसा दिला; पण त्याचा हिशोब योग्य पद्धतीने पारदर्शक समयबद्ध पद्धतीने करणे आवश्यक होते. या विशेष योगदानासाठी आम्ही तुमच्यापुढे नतमस्तक आहोत. वसिष्ठांच्या परंपरेचे पाईक असलेले महाराज आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींकडून राष्ट्रकार्याची धुरा वहाण्यासाठी त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व, संतत्व, श्रेष्ठत्व, विद्ववत्व आणि भक्तीलीनत्व आणि आचरत्व स्वयं सिद्ध आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना एकाच मंचावर आणण्याचे कार्य प.पू. स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले आहे. अयोध्येतील राममंदिराची स्थापना त्यांच्यामुळेच झाली आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, माझ्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे. प.पू. स्वामीजींनी आम्हाला राष्ट्रकार्य करण्यासाठी शक्ती द्यावी, ही प्रार्थना ! – राहुल शेवाळे, खासदार, शिवसेना
वैशिष्ट्यपूर्ण :

सुरेश चव्हाणके यांनी बोलण्यास प्रारंभ करतांना ‘भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर’ असा उल्लेख केला.

संतांची वंदनीय उपस्थिती :

सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव, वसई येथील परशुराम तपोवन आश्रमाचे पूज्य भार्गवश्री बी.पी. सचिनवाला