सामाजिक कार्यकर्ते सुनील बेंडखळे ‘कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित

 वेरवलीतील शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

श्री. सुनील बेंडखळे यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करताना आमदार राजन साळवी आणि सहकलाकार

लांजा – लोकनाट्य आणि कला क्षेत्रातील विविध कार्याची दखल घेऊन लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेच्या वतीने येथील ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’चे सूत्रधार आणि मुख्य कलाकार तात्या गावकर उपाख्य सुनील बेंडखळे यांना जिल्हास्तरीय ‘कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वेरवली बुद्रुक येथील श्रीराम विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने नुकतेच ४०० प्रयोग पूर्ण केले आहेत. कोकणातील जाखडी, नमन, भजन आदी लोककलांच्या सादरीकरणातून मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्हीची अतिशय उत्तम सांगड घालणारे हे लोकनाट्य रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली लोप पावत चाललेली मूळ लोककला पुन्हा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतांनाच कोकणातील अनेक वास्तवांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न या लोकनाट्याद्वारे केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसह मुंबईत अनेक ठिकाणी लोकनाट्याचे अनेक प्रयोग सादर झाले आहेत. याशिवाय सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून तिवरे धरणग्रस्तांना साहाय्य, जिल्ह्यातील विविध शाळांच्या साहाय्यासाठी, तसेच हलाकीचे जीवन जगणार्‍या लोककलावंतांकरता या लोकनाट्याचे प्रयोग सादर केले आहेत. त्यातून अनेक गरजवंतांना साहाय्याचा हात दिला आहे. मुलुंड-मुंबईत पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात या चमूला गौरविण्यात आले.