१.२.२०२३ ते ५.२.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी ‘आकाशात माघ पौर्णिमेचा चंद्र पहातांना काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग करण्यात आला. तेव्हा साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्री. कुमार राजाराम घोरपडे, सांगली
१ अ. सनातन संस्थेच्या तीनही गुरूंचे दर्शन होणे : ‘आकाशात माघ पौर्णिमेचा चंद्र पहातांना मी पहिला श्वास घेतल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, दुसरा श्वास घेतल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि तिसरा श्वास घेतल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तीनही गुरूंचे मला दर्शन झाले’, याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
२. सौ. श्रद्धा देशमुख, मुंबई
२ अ. चंद्रामध्ये ‘ॐ’ दिसून त्यातून येणारा प्रकाश रामनाथी आश्रमावर पडत असल्याचे दिसणे : ‘आकाशात माघ पौर्णिमेचा चंद्र पहातांना मला चंद्राची कड आणि प्रभावळ लालसर दिसली. त्यात ‘ॐ’ स्पष्टपणे दिसला. ‘ॐ’मधून येणारा प्रकाश रामनाथी आश्रमावर पडत आहे’, असे मला दिसले.’
३. सौ. कपिला महेश घाणेकर, डोंबिवली पश्चिम, ठाणे.
३ अ. पहाटे नामजपाला बसल्यावर चंद्रात गुरुदेवांचे रूप दिसून त्यांच्याकडून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : ‘५.२.२०२३ या दिवशी पहाटे ४.१० वाजता मी नामजप करायला बसले. त्या वेळी खिडकीतून समोर पाहिले, तर चंद्र पुष्कळ लालसर दिसत होता. त्याचा तेजस्वी प्रकाश त्याच्या आजूबाजूला पसरला होता. चंद्राच्या आतमध्ये पाहिले, तर मला प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) दिसले. ‘त्यांच्याकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत होते’, असे मला जाणवले. ते सर्व पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. पहाटे ४.३० ते ५.३० या कालावधीत देवानेच माझ्याकडून नामजप करून घेतला.
३ आ. आदल्या दिवशी विश्रांती न घेता पहाटे उठूनही दिवसभर चैतन्य आणि उत्साह जाणवणे : आदल्या दिवशी शिबिरामध्ये विश्रांती न घेताही मला पहाटे जाग आली. इतर वेळी मी सकाळी ७ वाजता उठते; परंतु त्या दिवशी पहाटे ४.१० वाजता उठूनही दिवसभर मला पुष्कळ चैतन्य आणि उत्साह जाणवत होता.
३ इ. प्रयोग करतांना चंद्रामध्ये गुरुकृपायोगाचे चिन्ह दिसणे आणि प्रयोगाची कल्पना नसतांनाही गुरुदेवांनी पहाटेच चंद्रामध्ये दर्शन दिल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : त्याच दिवशी रात्रीच्या सत्रात सर्व शिबिरार्थींना रामनाथी आश्रमाच्या फाटकाजवळ जाऊन ‘चंद्राकडे पाहून काय वाटते ?’, असा प्रयोग करायला सांगितला. तेव्हा मला चंद्रामध्ये गुरुकृपायोगाचे चिन्ह दिसले; पण ‘मला या प्रयोगाविषयी काहीच ठाऊक नसतांना गुरुदेवांनी पहाटेच मला चंद्रामध्ये दर्शन दिले होते’, त्याबद्दल मला गुरुचरणी कृतज्ञता वाटली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ५.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |