‘मागील ३४ वर्षे मी साधनेचा प्रवास सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाछत्राखाली करत आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी माझ्याकडून साधना करून घेऊन माझी प्रगतीही करून घेतली आहे. माझ्यासारख्या सर्व साधकांचा साधनेच्या प्रगतीचा लेखा-जोखा (साधकांच्या आध्यात्मिक पातळीची माहिती) प्रत्येक गुरुपौर्णिमेला सांगितला जातो. सनातन संस्था ही एकमेवाद्वितीय आणि पहिलीच संस्था असेल की, ज्या संस्थेत साधकांच्या प्रगतीचा आढावा प्रतिवर्षी दिला जातो. ‘माझे स्वभावदोष आणि अहंचे पैलू, माझ्याकडून होणार्या चुका, अयोग्य साधना इत्यादींमुळे माझा साधनेचा प्रवास चढ-उताराचा आणि घसरगुंडीचा आहे’, हे मी अनुभवत आहे.
वर्ष २०१० मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६१ वरून ५० टक्क्यांवर घसरली होती. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ती ७० दिवसांत पूर्ववत् ६१ टक्क्यांवर आणली. ‘मी मोक्षाला घेऊन जाणार्या ‘रेल्वे’त बसलो असून, त्या ‘रेल्वे’चे ‘इंजिन’ साक्षात् विष्णूचा अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आहेत. त्यामुळे ते ही ‘रेल्वे’ मोक्षाच्या स्थानकापर्यंत घेऊन जाणारच आहेत. या ‘रेल्वे’मध्ये कुणी प्रथमवर्ग, कुणी द्वितीयवर्ग किंवा कुणी तृतीयवर्गाच्या डब्यात प्रत्येकाच्या आध्यात्मिक स्थितीनुसार बसलेले आहेत. ही ‘रेल्वे’ मोक्षाला जाईपर्यंत आता कुठल्याही मधल्या स्थानकावर साधकांना उतरायचे नाही. गुरुदेव सांगतील तशी साधना न थांबता करायची आहे’, असे मला गुरुकृपेने जाणवते. वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेला माझी आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिली, याविषयी कळल्यावर मला आरंभी खंत वाटली. ‘त्याविषयी चिंतन केल्यावर मला आणखी पुष्कळ प्रयत्न वाढवले पाहिजेत’, हे गुरुकृपेने माझ्या लक्षात आले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने नकारात्मकता जाऊन माझे मन स्थिर झाले आणि मला पुढील काव्य सुचले. ते गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने अर्पण करत आहे. (पू. वटकरकाका यांची हल्लीची पातळी ७४ टक्के आहे. ‘वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेलाही ७४ टक्के एवढीच होती. वर्ष २०२२ पर्यंत प्रतिवर्षी १ टक्क्याने प्रगती होत होती’, असे. पू. वटकरकाका यांनी सांगितले.- संकलक )
साधनामार्गात मी अडखळलो आज जरी ।
नसे तो शेवट माझा साधनेच्या मार्गावरी ।। १ ।।
सामर्थ्य आहे माझ्या गुरूंचे माझ्या पाठीशी ।
नेतील मजला मोक्षाला नक्कीच लवकरी ।। २ ।।
साधनामार्ग रोखण्या टपल्या अनिष्ट शक्ती जरी ।
गुरुसामर्थ्यापुढे भस्म होतील त्याही लवकरी ।। ३ ।।
साधनामार्गात अडथळा आणते माझे प्रारब्ध जरी ।
योग्य क्रियमाणामुळे नष्ट होत आहे प्रारब्धही लवकरी ।। ४ ।।
मोहमायांची उठती वादळे साधना मार्गावरी ।
गुरुचरणांचे सुरक्षित कवच सदैव असे मजवरी ।। ५ ।।
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा वरदहस्त असे माझ्या शिरी ।
प्रेरणा देऊनी करवून घेत आहेत साधकांची प्रगती सत्वरी ।। ६ ।।
कृतज्ञताभावात ठेवूनी प्रयत्न करवून घेत आहेत माझे श्रीहरि ।
शरणागतभावात राहू द्या मजला, अशी प्रार्थना श्री गुरुचरणी ।। ७ ।।
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.७.२०२३)
|