बेलोशी, अलिबाग येथील ग्रामस्थांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !
बेलोशी (जिल्हा रायगड), १२ फेब्रुवारी (वार्ता.) – जुलमी इस्लामी पातशाह्यांना धूळ चारत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ ‘स्वराज्य’ नव्हते, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहोत, तर दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात श्री रामलल्ला विराजमान झालेले आहेत. आज भारतभूमी धर्मधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची वाट पहात आहे. हिंदु राष्ट्रासाठी संघर्षच करावा लागणार आहे; म्हणून बंधूंनो, हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे ध्येय ठेवायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले. समितीच्या वतीने मु. बेलोशी, ता. अलिबाग येथील मैदानात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. सभेचा प्रारंभ शंखनाद आणि वेदमंत्रपठण करून झाला. यानंतर समितीच्या देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी श्री. अमोल पाळेकर यांनी सांगितले. बेलोशी गावची ग्रामदेवी श्री जरीमरीमातेच्या साक्षीने ग्रामस्थांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार केला.
‘सनातन धर्माच्या रक्षणासाठी, तसेच धर्मजागृतीसाठी सर्वांनी वेळ देऊन, तन-मन-धन यांचा त्याग करून सनातन धर्मरक्षणाचा दिव्य संकल्प करूया’, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी केले.
क्षणचित्रे
१. बेलोशी गावासह अन्य गावांतील युवकांनी सभा यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.
२. सभेनंतर धर्मप्रेमींनी वक्त्यांना भेटून हिंदु धर्म आणि धर्मशिक्षण यांविषयी चर्चा केली.
३. सभेनंतर सर्व प्रदर्शन कक्षांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.