पूर्वीच्या संतांचा समृद्ध वारसा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज चालवत आहेत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांना भेटवस्तू देतांना डॉ. नीलम गोर्‍हे

आळंदी (जिल्हा पुणे), १० फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे अंत:करण पुष्कळ विशाल आहे. राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून कसे बोलायचे ? हे शिकण्यासारखे आहे. पूर्वीच्या संतांनी जे काम केले त्याचा समृद्ध वारसा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज चालवत आहेत, असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी येथे काढले. त्या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये त्या बोलत होत्या.

या वेळी व्यासपिठावर कांचीकामकोठी पीठाधीश पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती, पू. आनंदमूर्ती गुरु माँ, श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, पू. जितेंद्रनाथ महाराज, महंत डॉ. राहुल बोधी, पद्मश्री दादा विधाते, श्री भरत आनंद महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. नीलम गोर्‍हे यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना शाल आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या, तसेच उपसभापती डॉ. गोर्‍हे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी आळंदी देवस्थान आणि परिसर यांचा आढावा घेतला.