Indo Pacific Strategy : हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्र अधिक सुरक्षित आणि समृद्ध ! – अमेरिका

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या अ‍ॅड्रिएन वॉटसन

वॉशिंग्टन – हिंद पॅसिफिक महासागर रणनीतीमुळे हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्र अधिक सुरक्षित आणि समृद्ध झाल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेची हिंद-पॅसिफिक महासागर रणनीती लागू होऊन २ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या अ‍ॅड्रिएन वॉटसन यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधही अभूतपूर्व पद्धतीने प्रगती करत असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या नेतृत्वाचा परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन

प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना अ‍ॅड्रिएन वॉटसन म्हणाल्या की, अमेरिका हिंद-पॅसिफिक महासागर क्षेत्रात यापूर्वी कधीही इतकी बळकट नव्हती. गेल्या दोन वर्षांत, अमेरिकेने हिंद-पॅसिफिक महासागर क्षेत्र समृद्ध, सुरक्षित आणि स्वावलंबी ठेवण्यात ऐतिहासिक प्रगती केली आहे. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले. वॉटसन म्हणाल्या, ‘‘आम्ही जपान, कोरिया प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स, थायलंड यांच्याशी संबंध दृढ केले आहेत. व्हिएतनाम आणि इंडोनेशिया यांच्यासोबतचे द्विपक्षीय संबंधही सुधारले आहेत. भारतासोबतचे संबंध अभूतपूर्व पद्धतीने वाढवले जात आहेत.

अमेरिकेची हिंद-पॅसिफिक महासागराची रणनीती काय आहे?

हिंद-पॅसिफिक महासागर रणनीतीच्या अंतर्गत अमेरिका हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्रातील विविध देशांमधील सुरक्षा सहकार्य वाढवत आहे. विविध देशांना सैन्यबळ पुरवले जात आहे. यासह अमेरिकेने भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी धोरणात्मक भागीदारीही केली आहे. चीनचा सामना करण्याचा आणि हिंदी-प्रशांत महासागर मुक्त आणि समृद्ध ठेवण्याचा एक मार्ग म्हणून अमेरिकेच्या या धोरणाकडे पाहिले जात आहे. ‘क्वाड’ नंतर अमेरिका आता जपान आणि दक्षिण कोरियासोबत सैन्य युती करण्याच्या सिद्धतेत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातही अशीच युती होत आहे.