‘सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्याविषयी त्यांच्या बहिणीला लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. भाचीच्या लग्नानिमित्त वर्धा येथे आल्यावर साधकांसाठी सत्संग घेऊन साधकांना आनंद देणे
‘पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार या माझ्या मोठ्या बहीण आहेत. त्या गोवा येथून भाचीच्या (भाऊ श्री. गजानन गुजर यांच्या मुलीच्या) लग्नाला उपस्थित रहाण्यासाठी वर्धा येथे रात्री पोचल्या. पू. ताईंनी लगेच दुसर्या दिवशी सकाळी वर्धा येथे सत्संगाचे नियोजन करून सत्संग घेतला. (पूर्वी ताईंकडे उत्तरदायी साधिका या नात्याने वर्धा येथील साधकांच्या साधनेचे दायित्व होते.) वर्धा येथे आयोजित केलेल्या सत्संगाचा लाभ वर्धा, चंद्रपूर, हिंगणघाट आणि सभोवतीच्या गावांतील साधकांनी घेतला. त्या सत्संगातून साधकांना आनंद मिळाला.
२. ‘पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्याकडे पहात रहावे’, असे साधिकेला वाटणे आणि तिने निर्विचार स्थिती अनुभवणे
‘संत घरी आले’, या विचाराने माझ्या भावाची पुष्कळ भावजागृती झाली. त्याचा आनंद बघून आम्हा सर्वांची भावजागृती झाली. पू. ताईंचे आनंददायी रूप बघून ‘त्यांच्याकडे पहात रहावे’, असे मला वाटत होते. तेव्हा माझी निर्विचार स्थिती झाली. ‘संतांच्या अस्तित्वाने वातावरण आनंदी होते’, हे मला अनुभवायला आले.
३. ‘लग्नाच्या दिवशी पुष्कळ पाऊस पडेल’, असे वाटत असतांना पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्या उपस्थितीमुळे लग्नाच्या दिवशी पाऊस न पडणे
भाचीचे लग्न अमरावती येथे होते. त्या कालावधीत सगळीकडे वीज चमकून पुष्कळ पाऊस पडत होता. ‘लग्नाच्या दिवशीही पुष्कळ पाऊस पडेल’, असे सर्वांना वाटत होते; मात्र पू. ताईंच्या उपस्थितीमुळे वातावरणात पालट झाला. पाऊस पडला नाही आणि लग्न निर्विघ्नपणे पार पडले. (असे वाटणे हा साधिकेचा वैयक्तिक भाव आहे. – संकलक)
४. पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्या सहवासात नातेवाइकांना आनंद मिळणे
पू. ताई सतत प्रार्थना करत होत्या. ‘त्या लग्न सोहळ्याच्या वेळीही सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवत होते. त्यांचे बोलणे बालकभावातील होते. त्यांच्या प्रत्येक शब्दातून आनंद मिळत होता. पू. ताईंनी आमच्या नातेवाइकांना साधना करण्याचे महत्त्व सांगितले. ‘संतांच्या सहवासाने सर्वकाही पालटू शकते’, असे आमच्या नातेवाइकांनाही वाटले.
मला जे सुचले, ते देवाच्या चरणी अर्पण करते.’
– सौ. चंदा बागडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५२ वर्षे) (पू. मंदाकिनी डगवार यांची लहान बहीण), अमरावती (१०.१२.२०२३) ॐ
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |