गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा ३ टी.एम्.सी.ने अल्प झाल्याने पुणे महापालिकेसमोर पाणीसाठ्याच्या नियोजनाचे आव्हान !

पुणे – गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे पुणे शहरात पाण्याची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत थोडीशी बिकट आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये खडकवासला धरण साखळीत आजच्या दिवशी २०.२६ टी.एम्.सी. पाणीसाठा शिल्लक होता. आज तो १७.२९ टी.एम्.सी. आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी विचारात घेता पुढील ५ मासांचे काटेकोर नियोजन पाटबंधारे विभागासह पालिकेला करावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर ३ मासांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक झाली होती. यामध्ये एप्रिल, मे, जून आणि जुलै अशा ४ मासांसाठी पाणी वापरा नियोजन करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले होते. भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेता धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन वेळीच करणे आवश्यक आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये कालवा समितीची बैठक घेण्याचे नियोजन आहे, असे खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे यांनी सांगितले.