Saudi Arabia On Palestine : पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देईपर्यंत इस्रायलशी राजनैतिक संबंध ठेवणार नाही !

सौदी अरेबियाने अमेरिकेला केले स्पष्ट !

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन व सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान

रियाध (सौदी अरेबिया) – आम्ही अमेरिकेला सांगितले आहे की, गाझामधील आक्रमण थांबेपर्यंत, तसेच पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देत नाही, तोपर्यंत आम्ही इस्रायलशी राजनैतिक संबंध चालू करणार नाही, असे सौदी अरेबियाने म्हटले आहे.

इस्रायल-सौदी अरेबिया यांचे संबंध सुरळीत करण्यासाठी अमेरिका सर्व प्रयत्न करत आहे.

१.अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन ५ फेब्रुवारीला सौदीची राजधानी रियाधला पोचल्यानंतर त्यांनी इस्रायल-हमास युद्धावर राजकुमार महंमद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली. यानंतर दुसर्‍या दिवशी अमेरिकेने इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्यास सिद्ध असल्याचे सांगितले होते.

२. अमेरिकेच्या या वक्तव्यानंतरच सौदी अरेबियाने इस्रायलशी कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे सौदी अरेबियाने अद्याप इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध नाहीत.

३. सौदीचे म्हणणे आहे की, ते इस्रायलशी संबंध सामान्य करू शकतात; परंतु यासाठी त्यांना २००२ च्या अरब शांतता प्रस्तावाच्या अटी मान्य कराव्या लागतील. यात वर्ष १९६७ च्या युद्धात इस्रायलने कह्यात घेतलेल्या सर्व भागांवरून त्याचे नियंत्रण सोडून द्यावे लागेल, असा निर्णय घेण्यात आला. पॅलेस्टाईन हा स्वतंत्र देश मानला पाहिजे. पूर्व जेरुसलेम ही त्याची राजधानी मानावी लागेल. सर्व अरब देशांनी या अटी मान्य केल्या.