पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांची कृती
पुणे – पुणे येथे अमितेश कुमार यांनी नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील गुंड टोळ्यांचे प्रमुख अन् टोळीतील अन्य गुंड यांना पोलीस आयुक्तालयात बोलावले होते. या वेळी अनुमाने २५० ते ३०० गुंड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात आले होते. या वेळी गुंडांची ओळख परेड घेण्यात आली. स्वत: पोलीस अधिकार्यांनी सर्व गुंडांना ‘पुण्यात काही गुन्हेगारी कृत्य घडले किंवा काही गडबड झाली, तर आधी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, अशी तंबी दिली. गुंडांच्या टोळ्यांचे प्रमुख आणि गुंड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात बराच वेळ उपस्थित होते. पुण्यातील कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके इत्यादी गुंड उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी उपस्थित गुंडांकडून ‘यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नाही अथवा त्यात सहभागी होणार नाही’, असा अर्ज भरून घेतला. (असे केल्याने गुंड कधी स्वतः किंवा अन्य मार्गांनी गुन्हा करणार नाहीत, असे कधी होऊ शकते का ? गुंडांच्या अशा वर्तनावर कुणी विश्वास ठेवेल का ? असे झाले असते, तर आतापर्यंत देश गुन्हेगारीमुक्त केव्हाच झाला असता ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|