ओला कचरा न जिरवणार्‍या आस्थापनांची होणार पडताळणी !

पुणे – प्रतिदिन १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणार्‍या अनेक आस्थापनांमधील कचरा जिरविण्याची यंत्रणा (बल्क वेस्ट जनरेटर्स) बंद असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. संबंधित आस्थापनांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आस्थापनांची ७ दिवसांत पडताळणी करण्याचे आदेश विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले.

प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करणार्‍या गृहसंस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, वसतीगृहे, हॉटेल्स, मंगल कार्यालये, व्यावसायिक आस्थापने, बाजारपेठा, केंद्र सरकारच्या विभागांच्या इमारती, धार्मिक स्थळे, क्रीडा संकुले आदींनी जैव विघटनशील कचर्‍याची विल्हेवाट आवारात ‘कंपोस्टिंग’, ‘बायोमिथनायझेशन’ किंवा अन्य तंत्रज्ञानाद्वारे लावणे बंधनकारक आहे. प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या आस्थापनांना नोटीस देऊन दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असतांनाही त्यात टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पुढील ७ दिवसांच्या आत क्षेत्रीय कार्यालयांनी पहाणी करावी, असे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त संदीप कदम यांनी दिले आहेत.