आडिवरे येथील तावडे भवन कोकणची शान ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी – आडिवरे (ता. राजापूर) येथील तावडे भवन हा टोलेजंग वाडा म्हणजे कोकणची शान आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांची कोकणात आवश्यकता आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तावडे भवन आणि मंडळाचे कौतुक केले. तावडे भवनचे शिल्पकार ज्येष्ठ वास्तूविशारद संतोष तावडे यांचेही विशेष कौतुक याप्रसंगी केले.

५ फेब्रुवारी या दिवशी आडिवरे येथे ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी तावडे भवनला आवर्जून भेट दिली. या वेळी क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

तावडे वाडा वर्ष २०१७ मध्ये उभारण्यात आला. कोकणच्या लाल चिर्‍यापासून सौंदर्यपूर्ण वास्तू उभी रहाण्यामागे वास्तूविशारद संतोष तावडे यांचे योगदान होते. या वास्तुची वाहवा महाराष्ट्रात सर्वत्र होत असून पर्यटक वारंवार या वाड्याला भेट देत असतात. तावडे कुटुंबियांचा कुलस्वामी सप्तकोटेश्वराच्या मूर्तीचेही दर्शन ठाकरे दांपत्याने या वेळी घेतले.

राजस्थानच्या राजपूत घराण्याचे तावडे हे वंशज आहेत. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे कुटुंबियांची वस्ती होती. आडिवर्‍याच्या महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे. कोकणमधून बाहेरगावी गेलेले तावडे कुटुंबीय पुन्हा स्वत:च्या गावात येतात. त्यांच्यासाठी तावडे भवन बांधले. ही इमारत राजस्थानी वाड्याप्रमाणे केली आहे. विशिष्ट पद्धतीने दगडावर दगड लावून उभारलेल्या कमानी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

तावडे वाड्याचा दुसरा टप्पा लवकरच

यासंदर्भात तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे आणि सरचिटणीस सतीश तावडे म्हणाले, ‘‘तावडे वाड्याचा दुसरा टप्पा आता लवकरच चालू करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, सप्तकोटेश्वराचे मंदिर उभारण्यात येईल. वाड्याला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहून या दुसर्‍या टप्प्यात पर्यटकांसाठी सुविधा म्हणून खोल्या आणि बागेची निर्मिती केली जाणार आहे.