छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण न केल्यास आंदोलन ! – साथीदार युथ फाऊंडेशन

सांगली महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देतांना ‘साथीदार युथ फाऊंडेशन’चे पदाधिकारी, कार्यकर्ते

सांगली, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली शहरात विविध राजकीय व्यक्तींचे पुतळे, स्मारक हे कोणत्याही विशेष मागणीविना उभे केले जात आहेत. असे असतांना छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याविषयी महापालिकेकडून कोणतेच प्रयत्न होतांना दिसत नाही. या संदर्भात तत्कालीन महापौरांनी आश्वासित करून २ वर्षे लोटली, तरीही यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. तरी या संदर्भातील पुतळा उभारण्याच्या कामाची निविदा १५ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करावी; अन्यथा १६ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन ‘साथीदार युथ फाऊंडेशन’च्या वतीने उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले. (छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे महापालिका प्रशासनासाठी दुर्दैवी आहे ! महापालिका प्रशासनाने या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया चालू करावी ! – संपादक)

या प्रसंगी सर्वश्री शिवतेज सुहास सावंत, विशाळ दळवी, सचिन सूर्यवंशी, ऋषिकेश भोई, सत्यजित पठाडे, रोहित पाटील, अमित पवार यांसह अन्य उपस्थित होते.