धर्माधिष्ठित घटनात्मक हिंदु राष्ट्र स्थापन करा ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

मुरबे, बोईसर (प.) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

सौ. धनश्री केळशीकर

बोईसर – पाच जुलमी इस्लामी पातशाह्यांना धूळ चारत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अयोध्येत श्रीराममंदिरात रामलला विराजमान झाले. आपला प्रवास राममंदिरापर्यंतचा नाही, तर रामराज्यापर्यंतचा आहे. आपण हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत. यासाठी धर्माधिष्ठित आणि घटनात्मक हिंदु राष्ट्र स्थापन करा !, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुरबे, बोईसर (प.), ता. पालघर येथील श्रीराममंदिरात २ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या. या वेळी समितीचे श्री. पंडित चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेला मुरबे गावाच्या सरपंच सौ. मोनालिसा तरे आणि प्रतिष्ठित श्री. प्रमोद आरेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

धर्मद्वेष्ट्यांचा सनदशीर मार्गाने विरोध करा ! – पंडित चव्हाण, हिंदु जनजागृती समिती

‘कृण्वन्तो विश्वमार्य्म’ आणि ‘वसुधैव कुटुंम्बकम्’ अशी उदात्त आणि सर्वसमावेशक भावना असलेल्या विश्वातील एकमेव हिंदु धर्मावर धर्माची कावीळ झालेले काही धर्मद्रोही टीका करतात. आजही सनातन धर्म टिकून आहे, तो चिरंतन आणि शाश्वत आहे. हिंदु देवता, धर्मग्रंथ, तसेच श्रद्धास्थाने यांचे विडंबन करणार्‍या धर्मद्वेष्ट्यांचा सनदशीर मार्गाने विरोध करा !

क्षणचित्रे

१. सभेनंतर जिज्ञासूंनी वक्त्यांना भेटून हिंदु धर्माविषयी चर्चा केली.

२. सभा यशस्वी होण्यासाठी गावातील युवकांनी परिश्रम घेतले.