Netanyahu Hamas: इस्रायलला हमासचा अंत हवा आहे! – पंतप्रधान नेतान्याहू

इस्रायल -हमास युद्ध !

बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – हमास या आतंकवादी संघटनेच्या एका नेत्याने म्हटले आहे की, इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेले युद्ध थांबण्यासाठी करार करायचा झाल्यास, त्याला बराच वेळ लागेल. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, इस्रायलला हमासचा अंत हवा आहे.

१. गेल्या आठवड्यात इस्रायल, अमेरिका, इजिप्त आणि कतार यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये युद्धविराम आणि हमासने बंदी बनवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी करार करण्याविषयी दीर्घ चर्चा केली.

२. यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी इस्रायल आणि हमास लवकरच युद्धविराम घोषित करू शकतात, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वेळी कतारने हमासची बाजू मांडली होती; कारण हमासचे अनेक नेते कतारमध्ये रहातात.

३. त्यानंतर हमासनेच इस्रायलशी असा करार करण्यास नकार दिला आहे. त्याचा म्होरक्या ओसामा हमदानने लेबनॉनमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही सूत्रावर एकमत होऊ शकलेले नाही. कुठेतरी काहीतरी कमतरता नक्कीच आहे.

४. कोणत्याही परिस्थितीत सैनिकी कारवाया थांबवणार नसल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही पुन्हा कडक धोरण अवलंबले आहे. नेतान्याहू म्हणाले की, जर हमासला मोकळे सोडले तर तो पुन्हा आक्रमण करील.