मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि गोंदिया या शहरांचा समावेश
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील ५ शहरांमध्ये हिंसक कारवाया घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे. सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला जाण्यासाठी हे केले जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि गोंदिया या ५ शहरांमध्ये नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्याचा कट रचला आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
ते म्हणाले…
१. युनायटेड फ्रंट हा माओवाद्यांचाच एक भाग आहे. हे माओवादी गट शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात रोष निर्माण करण्याचे काम करत आहेत.
२. शहरी नक्षलवाद्यांची गोपनीय माहिती मिळाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, गोंदिया, नागपूर या शहरांमध्ये त्यांनी त्यांची यंत्रणा कार्यरत केली आहे. या ठिकाणी शहरी नक्षलवाद पसरवला जात आहे. शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देणार्या ५४ संस्थांच्या कारवायांवर आमचे लक्ष आहे.
३. समाजात सरकारविरोधी असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलने करण्याचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. अशांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
४. पुण्यातील झोपडपट्टीतील काही मुले नक्षली चळवळीसाठी जंगलात पाठवली जात आहेत. पुण्यात आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात असलेला संतोष सेलार याला नक्षलवाद्यांनी जंगलात पाठवले होते. नक्षलवादी कारवाया घडवून आणण्यासाठी शहरी नक्षलवादी अशा तरुणांची भरती करून त्यांना प्रशिक्षणासाठी जंगलात पाठवत आहेत.
संपादकीय भूमिकानक्षलवाद संपवण्यासाठी प्रथम शहरांमध्ये फोफावणारा शहरी नक्षलवाद संपवणे आवश्यक आहे. जिहादी आतंकवादाएवढीच ही समस्या गंभीर असून ती सोडवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत ! |